शिवेंद्रसिंहराजेंनी मागताच अजित पवारांकडून श्री गणेशा, सातारा जिल्ह्यातील 'या' मोठ्या प्रकल्पासाठी 57 कोटी मंजूर

उमेश बांबरे
Friday, 21 August 2020

या निधीसह सातारा कास ते बामणोली या बाधित रस्त्याच्या कामासाठीही सहा कोटींच्या निधीची वेगळी तरतूद करून हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.

सातारा : निधीअभावी कास धरणाच्या कामाला ब्रेक लागला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरून कास धरणाच्या कामासाठी वाढीव 57 कोटी निधी देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे कास धरण प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सातारा जिल्हा बॅंकेने आणली तुमच्यासाठी अनाेखी याेजना
 
सातारा शहरासह परिसरातील 15 गावांचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटण्यासाठी कास धरणाची उंची वाढवणे आवश्‍यक होते. हे ओळखून आमदार भोसले यांनी कॉंगेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. कास धरणाची उंची वाढवण्याचे काम मंजूर करून घेतले होते. त्याच वेळी पाणीपुरवठा विभागाकडून निधीही उपलब्ध झाला होता, तसेच वन विभाग, हरित लवाद यासह अनेक विभागांच्या परवानगीही शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून मिळाल्या होत्या. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. सध्या कास धरण प्रकल्पाचे काम 75 ते 80 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, वाढीव निधीची तरतूद न झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून पुढील काम रखडले होते.

साताऱ्यात आजपासून पाणी कपात; काेणत्या दिवशी पाणी येणार नाही वाचा सविस्तर
 
महाआघाडी मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पवार यांना सातारकरांचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी कास धरण प्रकल्पासाठी वाढीव निधी देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात सर्व विभागांची बैठक घ्यावी, असे पत्रही त्यांनी दिले होते. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनात आज बैठक झाली. या बैठकीला शिवेंद्रसिंहराजे भोसले, पाणीपुरवठा विभागाचे सचिव चहांदे, नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक, वित्त व नियोजन विभागाचे सचिव दहिळे, जलसंपदा विभागाचे सचिव मोहिते, संबंधित सर्व विभागांचे अधिकारी, तसेच राजू भोसले उपस्थित होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह, सातारा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

आता कडुनिंब पळविणार कोरोनाला? कसे ते वाचा
 
बैठकीत झालेल्या चर्चेनंतर कास धरण प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी सुधारित प्रस्तावाला मान्यता देण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी वाढीव 57 कोटी निधी नगरविकास विभागामार्फत नगरोत्थानमधून उपलब्ध करून देण्याचा निर्णयही झाला. या कामाचा सुधारित वाढीव निधी मागणी प्रस्ताव येत्या सात दिवसांत देण्याच्या सूचना श्री. पवार यांनी सातारा पाटबंधारे विभागाला केल्या. दरम्यान, या निधीसह सातारा कास ते बामणोली या बाधित रस्त्याच्या कामासाठीही सहा कोटींच्या निधीची वेगळी तरतूद करून हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याचा निर्णय श्री. पवार यांनी घेतला. त्यामुळे कास धरण प्रकल्पातील रखडलेली घळ भरणी, सांडवा बांधकाम व उर्वरित सर्व प्रकारची कामे मार्गी लागण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. जून 2021 पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar Sanctioned Fund For Kas Dam Project After Shivendrasinhraje Bhosale Demand