'अजिंक्याता-या' च्या विकासाचा सातारा पालिकेचा थेट किल्ल्यावरुनच निर्धार

गिरीश चव्हाण
Wednesday, 13 January 2021

सभेचे ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात येत होते. प्रक्षेपणादरम्यान तांत्रिक अडचण आल्याने ऑनलाइन सभेचे कामकाज खोळंबले. प्रयत्न करूनही तांत्रिक अडचण दूर न झाल्याने नंतर उपस्थितांसमोर सभेचे कामकाज सुरू करण्यात आले.

सातारा : अजिंक्‍यतारा किल्ल्यावर झालेल्या सातारा पालिकेच्या पहिल्या विशेष सभेत किल्ल्याचा विकास करण्यासाठी विकसन आराखडा (डीपीआर) तयार करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव पुढील मंजुरीसाठी नगरविकास मंत्रालयास सादर करण्याबरोबर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे विकसन आराखडा सादर करण्याच्या विषयावर या सभेत चर्चा झाली. पालिकेच्या इतिहासात सभागृहाबाहेर झालेली ही पहिलीच सभा ठरली आहे.
चर्चाच चर्चा! अकरा तारखेचीच चर्चा  

छत्रपती शाहू महाराज यांचे अजिंक्‍यतारा किल्ल्यावर 12 जानेवारीस मंचकारोहण झाले होते. त्यानिमित्त गेल्या काही वर्षांपासून साजऱ्या करण्यात येणाऱ्या "सातारा स्वाभिमान दिना'च्या औचित्याने अजिंक्‍यतारा किल्ल्यावर तब्बल दहा महिन्यांच्या कालावधीनंतर येथील पालिकेची विशेष सभा आयोजित करण्यात आलेली होती. या सभेसाठी नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट, नगरसेवक निशांत पाटील, ऍड. दत्ता बनकर, शेखर मोरे, किशोर शिंदे, राजू भोसले, ज्ञानेश्‍वर फरांदे, बाळासाहेब ढेकणे, सुनील काळेकर, श्रीकांत आंबेकर, सभापती सीता हादगे, स्नेहा नलावडे, सिध्दी पवार, रजनी जेधे, सुजाता राजेमहाडिक तसेच पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

राजेंच्या कृतीने भाजपात नाराजी; पालिका निवडणुकीत स्वतंत्र अस्तित्वाचा निर्धार 

सुरुवातीस ऍड. बनकर यांनी सभेपुढे अजिंक्‍यतारा किल्ल्याचा विकास आराखडा तयार करण्याचा विषय मांडण्यात येणार असल्याचे सांगितले. या विषयात किल्ल्यावरील तळ्यांचे सुशोभीकरण, बगीचा निर्माण करणे, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, पुनर्निर्माण करण्याचा तसेच त्यासाठी विविध विषयांतील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या 48 जणांची समिती स्थापण्याच्या उपविषयांचा समावेश असल्याचे ऍड. बनकर यांनी स्पष्ट केले. यानंतर बाळासाहेब ढेकणे यांनी या विषयाच्या अनुषंगाने मत मांडत सर्वप्रथम किल्ला परिसरातील रस्ता दुरुस्तीला प्राधान्य देण्याची मागणी केली. निशांत पाटील यांनी किल्ल्याच्या अनुषंगाने तयार करण्यात येणारा विकास आराखडा नगरविकास मंत्रालयास सादर करतानाच त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेण्याचा विषय उपस्थित केला. सभेसाठी उपस्थित असणाऱ्या नगरसेवकांची मते जाणून घेतल्यानंतर मांडलेला विषय एकमताने मंजूर करण्याचे आवाहन नगराध्यक्षा कदम यांनी केले. यानुसार उपस्थित नगरसेवकांनी विषय मंजुरीचा होकार नोंदवला. विषय मंजूर झाल्याचे जाहीर करत नगराध्यक्षा कदम यांनी अजिंक्‍यतारा किल्ला सातारा पालिकेच्या हद्दीत आला आहे. यापूर्वी पालिकेने किल्ल्याच्या विकासासाठी 60 लाखांचा निधी मंजूर केला होता. आता या निधीत वाढ करण्यासाठीचा विषय येत्या पालिकेच्या सभेत घेण्यात येणार असल्याचेही सांगितले. 

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा 

तांत्रिक त्रुटींमुळे ऑनलाइन सभा ठप्प 

विशेष सभेसाठी सर्वच नगरसेवकांना ऑनलाइन हजेरी लावण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने केल्या होत्या. यानुसार किल्ल्यावर सुरू असणाऱ्या सभेचे ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात येत होते. प्रक्षेपणादरम्यान तांत्रिक अडचण आल्याने ऑनलाइन सभेचे कामकाज खोळंबले. प्रयत्न करूनही तांत्रिक अडचण दूर न झाल्याने नंतर उपस्थितांसमोर सभेचे कामकाज सुरू करण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Development Of Ajinkyatara Fort Satara Muncipal Council Satara Marathi News