

Dhondewadi Ganesh Visarjan Dispute
esakal
कऱ्हाड : धोंडेवाडी (ता. कऱ्हाड) येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन मारामारी झाली. या प्रकरणी कऱ्हाड तालुका पोलिसांनी १६ जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोन्ही मंडळांकडील डीजे, बँड जीप, ट्रॅक्टर-ट्रॉली असा सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.
पोलिसांची माहिती अशी : धोंडेवाडी येथे बुधवारी (ता. २४) रात्री नऊच्या सुमारास नवभारत गणेश मंडळ आणि धनराज गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका बिरोबा मंदिर चौकात आल्या होत्या. त्यावेळी दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. त्यातच एका मंडळाच्या सदस्याने मिरवणुकीजवळ फटाक्यांची माळ लावल्याने दुसऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा संताप झाला.
त्यातून दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. घटनेनंतर पोलिसांनी नवभारत मंडळाच्या डीजे चालकाला डीजे बंद करण्याचे, तसेच धनराज गणेश मंडळाच्या संबंधितांना बँड बंद करण्याचे निर्देश दिले. मात्र, पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. मिरवणुकीदरम्यान मानवी जीवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी १६ जणांवर कारवाई केली. याप्रकरणी कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने दोन्ही मंडळांनी वापरलेला डीजे, बँड जीप आणि ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिरवणुकीदरम्यान मानवी जीवितास धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.ही कारवाई पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, पोलिस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील. पोलिस हवालदार शशिकांत काळे, तानाजी बागल, अर्जुन पाचुपते, शरद चव्हाण, आकर्षण फडतरे आणि उमेश गुरव यांनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.