Eknath Shinde : बाळासाहेबांचे वारसदार म्हणजे हिऱ्यापोटी गारगोटी; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे.
uddhav thackeray and eknath shinde
uddhav thackeray and eknath shindesakal
Updated on

सातारा - बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यांची विचारधारा होती, त्यामुळे त्यांचा नकली आवाज काढून बाळासाहेबांची विचारधारा कोणालाही मिटवता येणार नाही. गर्व से कहो हम हिंदू है, हा नारा बाळासाहेबांनी दिला होता; परंतु त्यांचे वारसदार म्हणून पुढे आलेल्यांना हा विचार पेलवला नाही.

त्यामुळे हिऱ्यापोटी गारगोटी ही म्हण खरी ठरली आहे. या गारगोट्यांनी व्यक्तिगत महत्त्व सांगण्यासाठी हिंदुत्वाला आणि बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली, असा सणसणीत टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या महाबळेश्वरातील दरे गावी मुक्कामी असून, आज त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये मेळाव्यात केलेल्या टीकेला यावेळी त्यांनी प्रतिउत्तर दिले.

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘२०१९ मध्ये स्वार्थासाठी बाळासाहेबांचे, हिंदुत्वाचे विचार सोडले. त्याचा परिणाम निवडणुकांत झाला. आता लोक बरोबर राहत नाहीत, त्यांना सोडून चाललेली आहेत. लोकांच्या मनातून ते उतरले आहेत. नाशिकमध्ये बाळासाहेबांचे लाखो शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याचे पाप केले आहे.

खरं म्हणजे हा दुर्दैवी प्रकार असून, स्वतः केलेले पाप झाकण्यासाठी बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याचा पोरकटपणा उबाठा गटाने केला आहे. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे त्यांचा नकली आवाज काढून बाळासाहेबांची विचारधारा कोणालाही मिटवता येणार नाही.

गर्व से कहो हम हिंदू है... हा नारा बाळासाहेबांनी दिला होता; परंतु त्यांचे वारसदार म्हणून पुढे आलेल्या लोकांना हा विचार पेलवला नाही. त्यामुळे हिऱ्यापोटी गारगोटी ही म्हण खरी ठरली, हे दुर्दैव आहे. या गारगोट्यांनी व्यक्तिगत महत्त्व सांगण्यासाठी हिंदुत्वाला आणि बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आहे.

विधानसभेत शंभरपैकी फक्त वीस जागा मिळाल्या. शिवसेना ८० जागा लढवून ६० जागा जिंकली. म्हणजे खरी शिवसेना कोणाची? हे जनता जनार्दनाच्या दरबारात देखील शिक्कामोर्तब झाले.’ राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले.

बाँबस्फोटातल्या आरोपीला बरोबर कोणी फिरवले, ही बाळासाहेबांच्या विचारांशी बेइमानी नाही का?, असा प्रश्नही एकनाथ शिंदेंनी केला. हे लोक म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, मी तर म्हणतो केवळ हिंदुत्वच नाही, तर यांनी लाजही सोडली आहे. लाखो शिवसैनिकांचे दैवत बाळासाहेब आहेत आणि बाळासाहेबांचे आवाज काढून कोणीही तुम्हाला स्वीकारणार नाही.

आम्ही गहाण टाकलेला धनुष्यबाण, काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना २०२२ ला सोडवली. आम्ही सर्वसामान्य माणसाच्या मनातले सरकार आणले. त्यामुळे फक्त ते सत्तेतून उतरले नाहीत, तर लोकांच्या मनातून देखील उतरले आहेत. त्यांना थोडी जरी जनाची नाही तर मनाची असेल, तर असले पोरकट आणि थिल्लर प्रकार करून बाळासाहेबांचा अवमान करू नका, त्यांना वेदना होतील.

शिवरायांचे स्मारक बांधणार

खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागणीबाबत एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मुख्यमंत्री यांनी स्वतः रायगडावर बोलताना सरकार कोणत्याही परिस्थितीत छत्रपतींचे स्मारक बांधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा केली आहे.

उदयनराजे यांनी देखील आपली भावना व्यक्त केली आहे. ताराराणी महाराणींचे योगदान खूप मोठे असून, त्यांच्या समाधीबाबतही सरकारचे दुर्लक्ष होणार नाही.’ आपले बारा किल्ले युनेस्कोच्या यादीत गेले आहेत. ही आपल्यासाठी मोठी अचिव्हमेंट आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वसामान्य मुस्लिमांसाठी निर्णय

वक्फ बोर्डाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘वक्फ बोर्डाबाबत न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदरच करू; पण मूठभर लोकांच्या हातात वक्फची प्रॉपर्टी होती. कोट्यवधी रुपयांची जमीन लाटण्याचे आणि लुबाडण्याचे काम होत होते. याचा फायदा सर्वसामान्य गरीब मुस्लिम व्यक्तींना झाला पाहिजे. हा त्यामागचा उद्देश होता.’

मी गावी जातो ते लंडनला जातात...

मी गावी आलो की या लोकांना चिंता असते. मी शांत बसलो की लोकांना चिंता असते. ते गावी जात नाहीत ते लंडनला जातात. मी गावी येतो. माझी नाळ गावातल्या लोकांशी आहे, त्यामुळे मी गावी येतो.

माझी संकल्पना आहे या पंचक्रोशीतला तरुण नोकरीसाठी आपलं गाव सोडून बाहेर जाता कामा नये. मी गंभीर झालो तर गंभीर का झालो? हसलो तर का हसलो? गावी आलो तर गावी का आलो? हे विरोधकांसाठी संशोधनाचा विषय आहे. त्यांनी त्यावर संशोधन करत राहावं, मी माझं काम करत राहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com