Satara News : मंत्री छगन भुजबळांना मराठा समाजाचे थेट आव्हान; आटकेतील मराठे आक्रमक, जशास तसे उत्तर देण्याचा इशारा | direct challenge of Maratha community to chhagan bhujbal Marathas in atak are aggressive | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

direct challenge of Maratha community to chhagan bhujbal Marathas in atak are aggressive

Satara News : मंत्री छगन भुजबळांना मराठा समाजाचे थेट आव्हान; आटकेतील मराठे आक्रमक, जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

कऱ्हाड : मंत्री छगन भुजबळ यांनी कऱ्हाडमध्ये येऊन दाखवावे. आम्ही त्यांना आमची ताकद दाखवू. पुन्हा मराठा समाजाचा अवमान करणारी वक्तव्य केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा आटके (ता. कऱ्हाड, जि.सातारा) गावातील सकल मराठा समाज बांधवांनी आज दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज बांधवांविरोधात मंत्री भुजबळ यांच्यासह काही राजकीय वादग्रस्त व अवमानकार वक्तव्य करत आहेत. या वक्तव्यांचा निषेध नोंदवत जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आटके गावातील मराठा समाज बांधव सोमवारी सायंकाळी एकत्र आले होते.

मराठा समाज शांत आहे. लोकशाही मार्गाने मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. मात्र मंत्री भुजबळ यांच्यासह काही राजकीय पक्षांचे नेते आपल्या स्वार्थासाठी ओबीसी समाज बांधव व मराठा समाज बांधव यांच्यात गैरसमज निर्माण करून दंगल घडविण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यामुळे या नेत्यांनी मराठा समाजाबाबत आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत अपप्रचार करणे न थांबवल्यास राज्यातील मराठा समाज बांधवांकडून जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही यावे मराठा समाज बांधवांनी दिला.

महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा

छगन भुजबळ हे महाराष्ट्र कोणाचा आहे ? असे म्हणत आहेत याकडे लक्ष वेधत महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे हे लक्षात ठेवा असे सुनावत मराठा समाज बांधवांनी मंत्री भुजबळ यांच्यासह मराठा समाजाविरोधात बोलणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांचा निषेध नोंदवला.