
कुंभारगावच्या शिबेवाडीतील गरीब कुटुंबात जन्मलेल्या महेश यांना वयाच्या सहाव्या महिन्यात पोलिओमुळे अपंगत्व आले. उपचारासाठी अनेक दवाखान्यांच्या पायऱ्या झिजवूनही काही उपयोग झाला नाही. वाढ खुंटून दोन्ही पाय वाळले. मात्र, या अपंगत्वावर जिद्दीने मात करत महेश यांनी तळमावल्यातील श्री वाल्मीकी विद्यामंदिरात दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले.
ढेबेवाडी (जि. सातारा) : पोलिओमुळे दोन्ही पाय निकामी झालेले असतानाही शिबेवाडी (कुंभारगाव, ता. पाटण) येथील महेश शिवाजी कुंभार (वय 31) जीवनाची लढाई सक्षमपणे लढत आहेत. दुचाकींच्या चाकाचा आऊट काढण्याच्या व्यवसायासह पिठाची चक्की चालवून कुटुंबाला हातभार देत आहेत. एका दिव्यांग युवकाची मोठ्या जिद्दीने सुरू असलेली ही धडपड हातावर हात ठेऊन समस्यांचे गाऱ्हाणे गात बसणाऱ्या समाजातील धडधाकटांना लाजविणारी आहे.
कुंभारगावच्या शिबेवाडीतील गरीब कुटुंबात जन्मलेल्या महेश यांना वयाच्या सहाव्या महिन्यात पोलिओमुळे अपंगत्व आले. उपचारासाठी अनेक दवाखान्यांच्या पायऱ्या झिजवूनही काही उपयोग झाला नाही. वाढ खुंटून दोन्ही पाय वाळले. मात्र, या अपंगत्वावर जिद्दीने मात करत महेश यांनी तळमावल्यातील श्री वाल्मीकी विद्यामंदिरात दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. कुंभार कुटुंबीय वारकरी असून, घरात 38 वर्षांपासून पिठचक्कीचा व्यवसाय आहे. अपंगत्वावर मात करत महेश वयाच्या 16 व्या वर्षीच सफाईदारपणे चक्की चालवायला आणि मातीच्या सुबक चुली बनवायला शिकले.
हेही वाचा : फलटण-पंढरपूर मार्गावर टेंपोच्या धडकेत गरगडेचा युवक ठार
काही वर्षांपासून त्यांनी तळमावले येथे दुचाकी वाहनांच्या रिमचा आऊट काढण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या विविध व्यवसायातून त्यांनी कुटुंबाला चांगलाच हातभार दिला आहे. महेश यांच्या बंधूचा मुंबईत रिक्षाचा व्यवसाय आहे. महेश यांनी तबल्यासह विविध वाद्ये वाजविण्याचा छंद जोपासला आहे. सुनील राजे यांनी त्यांना त्याचे प्रशिक्षण दिले आहे. तबला, पखवाज, ढोलकी, ड्रमसेट ट्रिपल आणि कच्ची आदी वाद्ये वाजविण्यासह वडिलांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमात ते पखवाजाची साथ-संगत करतात. सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत महेश आपल्या कामात व्यस्त असतात, त्यांच्या या धडपडीत कुटुंबाचीही भक्कम साथ पाठीशी आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे