
वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न
सातारा : शहरातील वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी शहर वाहतूक शाखा सरसावली असून वाहतूक शाखा, शहर व शाहूपुरी पोलिसांनी आजपासून शुक्रवारपर्यंत (ता.२०) एकत्रितपणे विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.शहरातील वाहतुकीची शिस्त काही प्रमाणात पुन्हा बिघडत चालली आहे. भरधाव वेगातील वाहने, मोठ्याने वाजवले जाणारे हॉर्न यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः वृद्ध वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील हे चित्र बदलण्यासाठी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिले होते.
त्यानुसार शहर वाहतूक शाखा, शहर व शाहूपुरी पोलिसांनी एकत्रितपणे मोहिमेची आखणी केली आहे. आजपासून शुक्रवारपर्यंत या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. दोन सत्रांमध्ये ही वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. सकाळी साडेआठ ते १२ व सायंकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत ही मोहीम चालणार आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी शहर पोलिस ठाणे, शाहूपुरी पोलिस ठाणे व शहर वाहतूक शाखेची एकत्रित पथके तयार करण्यात आली आहेत. शहरातील गर्दी व प्रवेशाच्या ठिकाणांवर या कालावधीत लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यामध्ये पोवई नाका, मोळाचा ओढा, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, गोडोली नाका, शिवराज चौक, समर्थ मंदिर चौक या ठिकाणी पोलिस पथके तैनात केली जाणार आहेत.
वाहन तपासणी मोहिमेमध्ये प्रामुख्याने वाहनांची कागदपत्रे तपासणी, काचेवर फिल्म, फॅन्सी नंबरप्लेट, विना नंबरप्लेट, मोठा हॉर्न तसेच मोठा आवाज करणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्याचबरोबरोबर गाडी चालवणाऱ्या लहान मुलांच्या पालकांवरही कारवाई केली जाणार आहे. या मोहिमेमुळे आज सकाळी साडेआठपासून शहरातील प्रमुख ठिकाणी पोलिस तैनात झाले होते. अचानक सुरू झालेल्या या तपासणी मोहिमेमुळे नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांची चांगलीच भंबेरी उडाली होती. शहरात ठिकठिकाणी वाहनांची कागदपत्रे तपासताना पोलिस दिसत होते. या कालावधीत आढळून आलेल्या काळ्या काचांचे फिल्मिंगही पोलिसांनी उतरवले. त्यामध्ये वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल शेलारही सहभागी झाले होते.
तपासणी मोहिमेमध्ये वाहनांची काटेकोरपणे तपासणी करण्याचे निर्देश सर्व पथकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे.
- विठ्ठल शेलार, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा
Web Title: Discipline In Traffic Nine Days Special Inspection Campaign Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..