esakal | साताऱ्यात सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी; वादग्रस्‍त चार विषय स्‍थगित
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Municipality

प्रशासनासह सताधाऱ्यांनी सभेचे कामकाज पुढे रेटण्‍याचा सुरू केलेला प्रयत्‍न नगरसेवक लेवेंनी हाणून पाडला.

साताऱ्यात सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी; वादग्रस्‍त चार विषय स्‍थगित

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : सातारा नगरपालिकेच्‍या (Satara Municipality) झालेल्या ऑनलाइन सभेत सत्ताधारी आणि विरोधकां‍त विविध विषयांवरून खडांजगी झाली. घरपट्टी माफी, गाळे भाडे, अतिक्रमणे, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठीची खरेदी आदी विषयांवरील चर्चेदरम्‍यान वाद झाल्‍याने आरोग्‍य विभागासह इतर तीन विषय तहकूब करत उर्वरित ५४ विषयांना मंजुरी देण्‍यात आली. चार तास चाललेल्‍या या सभेत अनेक विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येत प्रशासनाची कोंडी केल्‍याचे दिसून आले.

ऑनलाइन सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्‍यक्षा माधवी कदम (Mayor Madhavi Kadam) होत्‍या. सभेसाठी मुख्‍याधिकारी अभिजित बापट, उपाध्‍यक्ष मनोज शेंडे, सर्व विभागप्रमुख तसेच सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक उपस्‍थित होते. सभेपुढे ५८ विषय मंजुरीसाठी ठेवण्‍यात आले होते. विषयपत्रिकेचे वाचन सुरू असतानाच नगरसेवक वसंत लेवे, अशोक मोने यांनी हरकती घेत प्रशासनाला धारेवर धरले. आरोग्‍य विभागाच्‍या कचरा संकलन, घंटागाड्या, विलगीकरण, वाहतूक आदी विषयांवर या दोघांनी पालिका प्रशासनाची कोंडी केली. ही कोंडी फोडत प्रशासनासह सताधाऱ्यांनी सभेचे कामकाज पुढे रेटण्‍याचा सुरू केलेला प्रयत्‍न श्री. लेवे, श्री. मोने यांनी हाणून पाडत उपस्‍थित प्रश्‍‍नांची उत्तरे मागितली.

हेही वाचा: 'मराठ्यांविरोधी वक्तव्य करणाऱ्या विजय वडेट्टीवारांची हकालपट्टी करा'

त्यानंतर त्‍यांनी शहरातील अतिक्रमणांवरून प्रश्‍‍न उपस्‍थित केले. त्यावर अभिजित बापट यांनी मोती चौक परिसरातील अतिक्रमणे हटवत गाडे जप्‍त करण्‍याचे आदेश यंत्रणेस दिले. कामकाजादरम्‍यान घरपट्टी माफी तसेच हॉकर्स अनुदानावरून ॲड. दत्ता बनकर आणि अविनाश कदम यांच्‍यात जुंपली. साताऱ्याच्‍या गुरुवार पेठेतील व्यापारी गाळ्यांच्‍या भाडेवसुली व इतर कारणांवरून श्री. लेवे, श्री. मोने यांनी पालिका प्रशासनास धारेवर धरले. या विषयांवरील वादानंतर श्री. बापट यांनी संबंधितांकडून दहा वर्षांचे भाडे वसूल करण्‍याचे आश्‍‍वासन सभागृहात दिले. राधिका रोडवरील सेनॉर चौकाच्या नामकरणाचा तसेच चिपळूणकर कॉलनीत संरक्षक भिंत बांधण्याचा, औषध फवारणी व इतर साहित्य खरेदीचे तीन असे एकूण चार विषय सभेदरम्‍यान तहकूब करण्‍यात आले.

हेही वाचा: बाल गणेशाने इथेच मारला सिंदुरासुरास

मालशे पूल कामाची होणार चौकशी

मालशे पुलाच्‍या रुंदीकरणाच्‍या नावाखाली बिल्‍डरला फायदा होईल, असे काम झाल्‍याचा आरोप ॲड. बनकर, अशोक मोने यांनी सभेत केला. स्‍वहित जोपासण्‍यासाठी पालिकेचे विनाकारण ५० लाख रुपये खर्च झाल्‍याचा आरोपही त्‍यांनी केल्‍यानंतर त्‍याबाबतचा वस्‍तुनिष्‍ठ अहवाल सोमवारपर्यंत (ता. ६) तयार करण्‍याचा निर्णयही सभेत घेण्‍यात आला. गेले काही दिवस या विषयावरून पालिका प्रशासन चर्चेच्‍या केंद्रस्‍थानी असून या कामासाठी एका नगरसेवकाने बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरल्‍याचेही समोर येत होते.

loading image
go to top