शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करा, जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त आदेश

सल्लाउद्दीन चोपदार
Sunday, 18 October 2020

जिल्हाधिकाऱ्यांनी पांढरवाडी, बिदाल, दहिवडी, म्हसवड या गावांतील शेतकऱ्यांना भेटी देत राजेवाडी तलावाची पाहणी करून माहिती घेतली. यानंतर देवापूर येथील शेतकरी रघुनाथ बाबर यांच्या द्राक्षबागेचे अवेळी पावसामुळे दावण्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. या शेतकऱ्याच्या बागेस भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.

म्हसवड (जि. सातारा) : माण तालुक्‍याच्या पूर्व भागात वादळी पावसाने झालेल्या पिके, फळबागा, रस्ते व पुलांचे मोठे नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. एकही शेतकरी पंचनामा व मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. 

तालुक्‍याच्या पूर्व भागाला वादळी पावसाने झोडपून काढले. अनेक भागांतील फळबागा व शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, याची पाहणी नुकतीच जिल्हाधिकारी सिंह यांनी केली. या वेळी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, विभागीय कृषी अधिकारी कोळेकर, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार चंद्रकांत सानप, गटविकास अधिकारी एस. बी. पाटील, सहायक गटविकास अधिकारी भारत चौगुले उपस्थित होते. 

पीक नुकसानीच्या पाहणीसाठी गृहराज्यमंत्री थेट बांधावर!

या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पांढरवाडी, बिदाल, दहिवडी, म्हसवड या गावांतील शेतकऱ्यांना भेटी देत राजेवाडी तलावाची पाहणी करून माहिती घेतली. यानंतर देवापूर येथील शेतकरी रघुनाथ बाबर यांच्या द्राक्षबागेचे अवेळी पावसामुळे दावण्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. या शेतकऱ्याच्या बागेस भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी दहिवडी परिसरातील बिदाल येथील कांदा, बटाटा, मका पिकांची पाहणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधित अधिकारी वर्गाने शासकीय मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. कोणी शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहिल्यास शेतकऱ्यांने गावच्या कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क करावा, तरीही कोणीही न आल्यास प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Collector Shekhar Singh Inspected The Crops Damaged Due To Rains At Maan Satara News