Diwali Festival 2020 व्वा.. क्या बात है! विद्यार्थ्यांनी बनवले स्वकमाईतून पर्यावरणपूरक कंदील

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त आकाश कंदील बनवून त्यांची विक्री करून स्वकमाई करण्याचादेखील चांगला संदेश दिलेला आहे.

सातारा : पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या येथील न्यू इंग्लिश स्कूलने आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी पर्यावरण पूरक आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा घेऊन नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. दिवाळी सणाचे औचित्य साधून दर वर्षीप्रमाणे याहीवर्षी इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी व पालकांसाठी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 

यामध्ये प्लॅस्टिक, थर्माकोलचा वापर न करता निरनिराळे कागद, दोरा, लोकर, फेविकॉल, कापड आदी साहित्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आकाश कंदील बनवण्याचे प्रात्यक्षिक संस्थेने घेतलेल्या सोशल मीडियावरील ऍपद्वारे दाखवण्यात आले. यातून विद्यार्थ्यांनी रंगीत कागदांचा वापर करून, तसेच फुगा फुगवून, फेविकॉलमध्ये दोरा बुडवून, फुग्यावर तो गुंडाळून, तसेच कागदाच्या चहाच्या कपापासून देखील सुंदर असे आकाशकंदील विद्यार्थ्यांनी बनवले. 

Diwali Festival 2020 दिवाळी खरेदीसाठी साताऱ्यात दुकानं हाउसफुल्ल; ग्राहकांची ब्रॅंडेड कपड्यांना पसंती

शाळेतील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त आकाश कंदील बनवून त्यांची विक्री करून स्वकमाई करण्याचादेखील चांगला संदेश दिलेला आहे. कार्यशाळेचे नियोजन कलाशिक्षक घनश्‍याम नवले व संदीप माळी यांनी शालाप्रमुख सुनील शिवले यांच्या संकल्पनेतून केले. कार्यशाळेत उपशालाप्रमुख सुनीता राव, पर्यवेक्षिका सुजाता पाटील, विनया कुलकर्णी व शिक्षक बंधू- भगिनींचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, सदस्य अनंत जोशी आदींनी कौतुक केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Festival 2020 News Eco-friendly Lanterns Made By The New English School In Satara