Diwali Festival 2020 : साता-याच्या बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साहाला उधाण

सिद्धार्थ लाटकर
Friday, 13 November 2020

दिवाळीच्या आनंदाला गोड-खमंग चव देण्यासाठी घरोघरी सुगरणींची धांदल सुरू असून, गल्ल्यागल्ल्यांतून त्याचा सुगंध दरवळू लागला आहे. 

सातारा : दिव्यांच्या प्रकाशाने उजळवून टाकणाऱ्या दिवाळीच्या स्वागतासाठी शहरासह जिल्हा सज्ज झाला आहे. दिवाळीच्या तयारीचा सुगंध दरवळू लागला आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साहाला उधाण आले आहे. बालचमूंच्या किल्ल्यावर मावळ्यांची घोडदौड सुरू झाली आहे.
 
गेल्या दोन दिवसांत दिवाळीची धामधूम खूपच जाणवू लागली. विविधरंगी आणि आकर्षक आकाशकंदील, शुभेच्छापत्रे, तऱ्हेतऱ्हेच्या पणत्या, किल्ले, सुगंधी उटणे या खास दिवाळीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी ओसंडून वाहत होती. प्रत्येक दुकानावरील रोषणाईने राजपथ झगमगू लागला आहे. चाकरमान्यांचे पगार झाल्यानंतर बाजारपेठेतील गर्दी वाढली.

शहारातील मोती चौक, खण आळी, कर्मवीर भाऊराव पाटील पथ या ठिकाणी जत्रेचे स्वरूप आले होते. आकाश कंदिलांपासून कपड्यांपर्यंत आणि पणत्यांपासून इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या नवनव्या वस्तूंपर्यंत सर्व प्रकारच्या खरेदीला गर्दी होती. या वर्षी अतिवृष्टीने काहीसे नुकसान झाले असले, तरी किमान सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने शेतकरी वर्गालाही दिलासा मिळाला आहे. नोकरदार, कामगारांचे पगार गेल्या काही दिवसांत झाल्याने बाजारपेठेत गर्दी वाढली आहे.

अभिमानास्पद! शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ. केशव राजपुरे जागतिक संशोधकांच्या यादीत

कापड दुकानांपासून फराळाच्या तयार पदार्थांच्या दुकानांपासून इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूपर्यंत, तसेच दुचाकी, चारचाकी वाहनांच्या एजन्सीजपर्यंत नागरिकांची गर्दी वाढली आहे. दिवाळीच्या आनंदाला गोड-खमंग चव देण्यासाठी घरोघरी सुगरणींची धांदल सुरू असून, गल्ल्यागल्ल्यांतून त्याचा सुगंध दरवळू लागला आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Festival 2020 News Satara Market Overcrowded To Celebreate Diwali Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: