जावली सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी राजाराम ओंबळे, उपाध्यक्षपदी हणमंत पवार

महेश बारटक्के
Wednesday, 14 October 2020

या निवडीनंतर आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार मकरंद पाटील आदींसह अनेक मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. 
 

कुडाळ (जि. सातारा) :  जावळी तालुक्‍याची मुख्य अर्थवाहिनी असलेल्या व 1,300 कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या जावली सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक राजाराम शंकर ओंबळे यांची, तर उपाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक हणमंत गणपत पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 
मुंबई येथील बॅंकेच्या गोल देऊळ येथील मुख्य कार्यालयात पदाधिकारी निवडीसाठी आज संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक गाडे-पाटील यांनी काम पाहिले. निवडीनंतर माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व बॅंकेचे मार्गदर्शक वसंतराव मानकुमरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ ओंबळे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

'हे वागणं म्हणजे बाबर सेनेसारखं'; कंगनाने शिवसेनेला पुन्हा डिवचलं

अध्यक्ष राजाराम ओंबळे म्हणाले, ""स्पर्धेच्या युगाचा विचार करून आधुनिक व तत्पर बॅंकिंग सेवा देण्याच्या दृष्टीने जावली बॅंक वाटचाल करेल. बॅंकेच्या व्यवसाय वाढीसाठी संचालक मंडळाच्या सहकार्याने विशेष प्रयत्न केले जातील.'' उपाध्यक्ष श्री. पवार यांनी निवडीबद्दल सर्व संचालकांचे आभार मानले.

साता-याच्या जिल्हाधिका-यांनी डायलिसिसच्या रुग्णांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय 
 
यावेळी बॅंकेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत गावडे, उपाध्यक्ष प्रकाश मस्कर, विक्रम भिलारे, भानुदास पार्टे, आनंदराव सपकाळ यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. निवडीनंतर आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार मकरंद पाटील आदींसह अनेक मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. 

संचालकांनी बॅंकेची धुरा ज्येष्ठांच्या खांद्यावर देण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. दोन्ही पदाधिकारी हे सहकार क्षेत्रातील अनुभवी असल्याने आगामी काळात बॅंकेच्या हितासाठी प्रयत्न करून ते बॅंकेला प्रगतिपथावर नेतील. 

- वसंतराव मानकुमरे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DMK Joali Sahkari Bank Election Satara News