कोरोनापश्‍चात लक्षणांकडे दुर्लक्ष नको : डॉ. सुभाष चव्हाण

उमेश बांबरे
Thursday, 22 October 2020

त्यामुळे कोरोनातून मुक्त झाल्यानंतर आरोग्याच्या तक्रारींकडे कोणीही दुर्लक्ष करणे धोक्‍याचे ठरू शकते. त्याबरोबरच कोरोना होऊ नये, यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना करणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी किमान आणखी 14 दिवस तरी काळजी घेणे गरजेचे आहे.

सातारा  : कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात चांगले असले तरी कोरोनामुक्त झालो म्हणून लगेच निर्धास्त राहणे टाळणे आवश्‍यक आहे. कोविडपश्‍चात आढळणाऱ्या विविध लक्षणांतून गुंतागुंत होऊन रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. अनेक रुग्णांना बरे झाल्यानंतरही त्यांना हृदयविकाराचा त्रास होणे, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होणे, जुलाब, खोकला, कणकणी आदी लक्षणे आढळतात. तर काहींना श्‍वसनाचा त्रास होऊन आगामी कालावधीत ऑक्‍सिजनची गरज लागते. अशी लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्‍यक बनले आहे.

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात कोरोनाबाधित शोधणे व त्यांच्यावर लक्षणानुसार उपचार करणे यावर आरोग्य प्रशासनाने लक्ष केंद्रित केले. परंतु, आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जिल्ह्यात चांगले राहिले आहे. 33 हजार 871 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दररोज साधारण 300 ते 400 रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी वयस्कर कोरोनामुक्त रुग्णांना कोविडपश्‍चात्य काही लक्षणे आढळतात. त्यातून त्रास होऊन अनेकदा रुग्णांच्या जिवावर बेतण्याचे प्रमाणही जिल्ह्यात आहे. अशा रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळणे आवश्‍यक असते. काहीवेळेस रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून दुर्लक्ष होत असल्याने रुग्ण बरा होऊनही दगावण्याची भीती असते.

गॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी  : अनुदान बंद 

कोविड बरा झाल्यानंतर पुन्हा त्रास होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पाच ते सात टक्के आहे. पण, काही तरुणांनाही त्रास जाणवत आहे. कोविडमुक्त झाल्यानंतर काही रुग्णांना हृदयविकाराचा त्रास जाणवतो. तर काहींना रक्तामध्ये गुठळ्या होणे, जुलाब, खोकला, कणकण किंवा बारीक ताप येणे अशी लक्षणे जाणवतात. ही लक्षणे पुढे जीवघेणी ठरू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यावर तातडीने उपचार घेणे आवश्‍यक होते. अशी लक्षणे मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, किडनीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये अधिक आढळतात. अशा रुणांनी सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे आहे. 
डॉक्‍टरांच्या मते कोरोनामुळे श्‍वसनसंस्थेत संसर्ग होणे, फुफ्फुसाला संसर्ग होतो. त्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते. परिणामी रक्तवाहिन्यांत गुठळ्याही होतात. यामुळे हार्टऍटॅक येण्याची शक्‍यता बळावते. अशावेळी रुग्णांना तातडीने उपचार करून रक्तवाहिनीतील गुठळ्या विरघळविण्यासाठी उपचार करणे आवश्‍यक असते. तसेच काहींना धाप लागण्याचे प्रकार होतात. अशावेळी पोर्टेबल ऑक्‍सिजन मशिनच्या सहाय्याने ऑक्‍सिजन घेणे गरजेचे असते. त्यासोबत काहींना जुलाब होणे, ताप येण्याचे प्रकार होतात. या लक्षणानुसार उपचार करून घेतला तर पुढील धोके टाळता येतात.

स्वस्तात सोन्याच्या बहाण्याने पावणेदोन लाखांना लुटले; तिघांना अटक

त्यामुळे कोरोनातून मुक्त झाल्यानंतर आरोग्याच्या तक्रारींकडे कोणीही दुर्लक्ष करणे धोक्‍याचे ठरू शकते. त्याबरोबरच कोरोना होऊ नये, यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना करणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी किमान आणखी 14 दिवस तरी काळजी घेणे गरजेचे आहे. 

""कोरोनापश्‍चात होणाऱ्या प्रमुख लक्षणांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण पाच ते सात टक्के रुग्णांत आहे. अशा रुग्णांना तातडीने उपचार मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी जनरल फिजिशियनशी संपर्क करून उपचार करू घेणे आवश्‍यक आहे. तरच पुढचा धोका टळू शकतो. यामध्ये वयस्कर व इतर आजार असलेल्या रुग्णांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर 14 दिवसतरी काळजी घेणे गरजेचे आहे.'' 

- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा 

 भाजपच्या सुनील काळेकरांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड

""कोरोना आजार हा नवीन असून, यातून बरे झालेल्या चार ते सहा टक्के रुग्णांना कोरोनापश्‍चात काही त्रास जाणवतो. यामध्ये रक्तवाहिन्यांत अडथळे निर्माण होणे, धाप लागणे, ताप, खोकला अशी लक्षणे दिसतात. अशा रुग्णांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांनी तातडीने उपचार घ्यायला हवेत. कोरोनामुक्तीनंतर लगेच धावपळ करण्यापेक्षा किमान 14 दिवस तरी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.'' 
-डॉ. विवेक भोसले, फिजिशियन, सातारा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors Advice Take Care Of Your Health After Recovery From Coronavirus Satara News