दुष्काळी माण तालुक्यात चिंचेमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा

केराप्पा काळेल
Wednesday, 25 November 2020

दर वर्षी या परिसरातील चिंचेचे उत्पन्न हे सरासरी जेमतेम असते. यावर्षी या परिसरात चिंचेच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर चिंचा लागडल्या असल्यामुळे या परिसरातून चांगले उत्पादन आणि रोजगारही उपलब्ध होणार आहे अशी माहिती नितीन शेटे यांनी दिली. 

कुकुडवाड (जि. सातारा) : माण तालुक्‍यात परतीचा पाऊस दमदार झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. दमदार पावसामुळे चिंचेच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर चिंचा लगडलेल्या आहेत. यातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न निघणार असून, आंबट चिंचेमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्याला गोडवा येणार आहे.

सातारा, सांगली, तसेच स्थानिक बाजारपेठ म्हसवड येथेही या भागातील चिंचेला मोठी मागणी असते. या भागातील व्यापारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन चिंचेची खरेदी करतात. गेल्या वर्षीही तालुक्‍यात चांगला पाऊस झाला होता. यावर्षीही दमदार परतीचा पाऊस बरसल्यामुळे चिंचेची झाडे बहरली असून, मोठ्या प्रमाणावर चिंचेच्या झाडांना फळधारणा झाली आहे. यामुळे अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, अशा शेतकऱ्यांना चिंचेच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. एवढेच नाही तर चिंचेच्या माध्यमातून काढणी, झोडपणी व फोडणे यातून अनेक महिला, पुरुषांना रोजगार मिळणार आहे.

कार्यकर्त्यांमधील चुळबुळ थांबविण्यासाठी करावा लागतं : अजित पवार
 
माण तालुक्‍यातील कुकुडवाड, विरळी, पानवन, वळई, जांभुळणी, शेनवडी, वरकुटे- मलवडी या गावांतून मोठे चिंचेचे वृक्ष आहेत, तसेच अनेक शेतकऱ्यांनी माळरानावर चिंचेची लागवड केली आहे. चिंचेचे झाड हे बहुपयोगी असते. चिंचेपासून मिळणाऱ्या चिंचोक्‍यांचा उपयोग अनेक उद्योगांमध्ये केला जातो. त्यातीलच एक उद्योग म्हणजे माण तालुक्‍यातील वरकुटे मलवडी आणि आटपाडीमधील झरे येथे घोंगडी तयार करण्याचा व्यवसाय केला जातो. या उद्योगात घोंगड्यास खळ देण्यासाठी चिंचोक्‍यांचा उपयोग होतो. टरफले वीटभट्टी व्यावसायिक विकत घेतात. चिंचेच्या पानांना आयुर्वेदातही चांगले महत्त्व आहे. 

""दर वर्षी या परिसरातील चिंचेचे उत्पन्न हे सरासरी जेमतेम असते. यावर्षी या परिसरात चिंचेच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर चिंचा लागडल्या असल्यामुळे या परिसरातून चांगले उत्पादन आणि रोजगारही उपलब्ध होणार आहे.'' 

- नितीन शेटे, चिंच व्यापारी, म्हसवड

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought Area Farmers Are Earning From Tamarind Satara News