गर्दी फुल्ल अन्‌ बत्ती गुल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Due load shedding lights in premises of tehsildar office went out Inconvenience in government office satara

गर्दी फुल्ल अन्‌ बत्ती गुल!

सातारा : विजेच्या भारनियमनामुळे तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील बत्ती गुल झाल्याने संपूर्ण कामकाज ठप्प झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रशासकीय कार्यालयातील गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था असणे आवश्‍यक आहे. परंतु, या ठिकाणची पर्यायी वीज यंत्रणा नादुरुस्त असल्याने तहसील कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना वीज नसतानाही या कारभाराचा ‘करंट’ लागत आहे.

राज्यभरात भारनियमन सुरू झाल्याचे दिसते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या भारनियमनाचा फटका प्रशासकीय कार्यालयांनाही बसण्यास सुरुवात झाली आहे. सरकारी कार्यालयांमध्ये वीज गेल्यास बॅटरी अथवा जनरेटरची सोय अशी पर्यायी व्यवस्था असणे आवश्‍यक आहे. मात्र, सातारा तहसीलदार कार्यालयातील बॅटरी या मोडकळीस आल्या आहेत. नागरिक दाखले घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. याचबरोबर विविध प्रकारचे दस्त करण्यासाठी निबंधक कार्यालयात झालेली गर्दी, विवाह नोंदणीसाठी आलेली जोडपी, तर सेतू कार्यालयात दाखले घेण्यासाठी झालेल्या गर्दीचे चित्र मंगळवारी तहसीलच्या आवारात दिसून येत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये वीज गेल्यानंतर सक्षम यंत्रणा असणे आवश्‍यक आहे. किंबहुना तहसीलदार कार्यालयासारख्या गर्दीच्या ठिकाणी तरी आवश्‍यकच आहे. मात्र, विजेअभावी कामे खोळंबल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, भारनियमन सुरू केल्याने दर आठवड्यात मंगळवारी वीज जाण्याचा प्रकार सुरू आहे. वीज गेल्यास तहसीलदार कार्यालयामध्ये नागरिकांनी तासन्‌ तास ताटकळत बसून ठेवले जाणार का, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित करून गैरसोय दूर करण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील वीज यंत्रणा दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

तहसीलदार कार्यालयातील आवारात मंगळवारी दुय्यम निबंधक कार्यालयात शेतजमिनीचे दस्त करण्यासाठी गेल्यानंतर वीज नसल्याने ‘उद्या या’ असे सांगण्यात आले. या ठिकाणी सेतू कार्यालयातही रांगा लगल्या होत्या. प्रशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वीज गेल्यानंतर पर्यायी वीज यंत्रणा आवश्‍यक आहे.

- जनार्दन पवार, नागरिक

Web Title: Due Load Shedding Lights In Premises Of Tehsildar Office Went Out Inconvenience In Government Office Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top