
-अनिकेत शिंदे
बावधन: मोफत पुस्तके, मोफत गणवेश, मोफत मध्यान्ह आहार, खेळायला भरपूर खेळणी. ना फी ना डोनेशन, तरीही जिल्हा परिषदेच्या शाळेत पाल्याला घालणे पालक टाळू लागल्याने शाळा, वर्ग बंद पडण्याची काही ठिकाणी वेळ आली आहे. आपल्या गावातील शाळा बंद पडणे, पट कमी होणे ग्रामस्थांनाही मनापासून रुचत नाही. त्यामुळेच गावातील शाळा टिकवायचीच, हा निर्धार केलेल्या बावधन (ता. वाई) येथील ग्रामस्थांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाल्याचा प्रवेश घेणाऱ्या पालकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामसभेत नुकताच घेतला आहे. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.