esakal | आठ हजार विद्यार्थी शाळेपासून दूरच
sakal

बोलून बातमी शोधा

Students

आठ हजार विद्यार्थी शाळेपासून दूरच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोना संकटामुळे दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या एक हजार १६८ पैकी एक हजार ११४ शाळा सुरू झाल्या असून, ३३ हजार २९७ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार २८६ विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. मात्र, अद्यापही सुमारे आठ हजार विद्यार्थी शाळेपासून दूर असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोरोना संकटामुळे मार्च २०२० पासून राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यामुळे, गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणातून धडे गिरवित आहेत. शाळांचे निकालही आधीच्या वर्गातील निकालाद्वारे लावण्यात आले. दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल नववी आणि अकरावीच्या गुणांवर आधारित देण्यात आले. दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेबर महिन्यात कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर महाविद्यालये सुरू करण्यात आली होती. मात्र, यंदा जानेवारीनंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

हेही वाचा: Power Crisis: कोळसा, रेल्वे आणि ऊर्जा मंत्रालयानं स्थापन केला 'आपत्ती गट'

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने मागील दोन आठवड्यांपूर्वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये, जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या ग्रामीण भागात एक हजार १४७ आणि शहरी भागात २१ शाळा आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातील एक हजार ९८ आणि शहरी भागातील १६ अशा एक हजार ११४ शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचा पट ३३ हजार २८ असून, शहरी भागात २६९ आहे. दरम्यान, जिल्ह्यात पाचवी ते आठवीचे तीन हजार ५६३ शिक्षक असून,त्यापैकी तीन हजार ४७७ शिक्षक उपस्थित आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अद्यापही काही गावांत कोरोनाचे रुग्ण असल्याने शाळा व्यवस्थापन समितीने शाळा सुरू करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे, संबंधित गावांमध्ये अजूनही महिनाभर शाळा सुरू होण्याबाबत अनिश्‍चितता आहे. याबाबत शिक्षण विभागही शाळांना भेटी देऊन विद्यार्थी व पालकांच्या अडचणी व सुरक्षेबाबत माहिती घेत आहे.

माध्यमिक शिक्षकांचे लसीकरण अपुरे

जिल्ह्यात शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांच्या लशींचे दोन्ही डोस होणे बंधनकारक होते. मात्र, सद्यःस्थितीत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण झाले असताना माध्यमिक व खासगी शिक्षकांचे लसीकरण होणे अद्यापही बाकी आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची भीती दूर करण्यात येत आहे. कोरोनाबाबत शाळांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असून, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर, शिक्षक व पालकांमध्येही समन्वय राखला जात आहे.

-प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

loading image
go to top