Devendra fadnavis eknath shinde
Devendra fadnavis eknath shinde Sakal

Satara : कोयनाकाठचा रिक्षाचालक बनला मुख्यमंत्री!

एकनाथ शिंदेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास; सातारा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत

भिलार : राज्याच्या राजकारणात गेली काही दिवस झालेल्या सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू बनलेले एकनाथ शिंदे आज अनपेक्षितपणे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याने साताऱ्याच्या कोयनाकाठाला एक सुखद धक्का बसला. शिंदे यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला मिळालेले हे पाचवे मुख्यमंत्रिपद असल्याने सातारा जिल्हाही यानिमित्ताने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेत आला.

महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब हे शिंदे यांचे मूळ गाव. अर्थात त्यांची सारी राजकीय कारकीर्द ठाणे जिल्ह्यात घडली असली, तरी कोयनाकाठचा हा पुत्र पुन्हा एकदा सातारकरांसाठीही प्रकाशझोतात आला आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत मृदुभाषी असलेल्या या कोयना पुत्राने रिक्षाचालक म्हणून ठाण्या-मुंबईत काम केले. पुढे शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, जिल्हाप्रमुख, कॅबिनेट मंत्री, शिवसेना नेता असा प्रवास करत ते आता थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले असून, ही त्यांची वादळी वाटचाल लोकांना थक्क करणारी वाटत आहे.

दरे तांब या गावात एकनाथ संभाजी शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. घरची परिस्थिती अगदी गरीब होती. शिक्षण पूर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ठाणे गाठले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. गरिबीचे चटके सहन केलेल्या शिंदे यांनी वागळे इस्टेटमधील मच्छीच्या कंपनीत सुपरवायझर म्हणून काही काळ काम केले. नंतर रिक्षा चालवण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. या काळात त्यांच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या विचारांचा प्रभाव पडला. या दोघांकडे आकर्षित होऊन त्यांच्या शब्दाखातर वाटेल ते करण्याची तयारी दाखवत १९८० मध्ये केवळ १६ व्या वर्षी शिवसेनेचा झेंडा शिंदे यांनी हाती घेतला. रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे शिंदे किसननगरचे शाखाप्रमुख बनले. शाखाप्रमुख असतानाच्या पाच वर्षांत त्यांनी दिघे यांच्या शब्दावर अनेक आंदोलने केली आणि एक सच्चा शिवसैनिक म्हणून नावलौकिक मिळवला.

त्यानंतर ते किसननगरमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढच्या काळात शिंदे यांना कौटुंबिक दुःखालाही सामोरे जावे लागले. एका दुर्घटनेत त्यांची दोन मुले कोयना धरणात बुडून मृत्युमुखी पडली. त्यावेळी खचून गेलेल्या शिंदे यांना सावरले ते आनंद दिघे यांनी. सभागृह नेतेपदाची जबाबदारी देत दिघे यांनी शिंदे यांना शिवसेनेच्या अधिक व्यापात अडकवले. २००१ ते २००५ अशी प्रदीर्घ कारकीर्द गाजविणाऱ्या शिंदे यांनी आपल्या कामाची छाप पाडली. शिंदे यांना ठाणे विधानसभेची उमेदवारी मिळाली. अतिशय शांत, संयमी आणि पटकन प्रतिक्रिया न देणाऱ्या शिंदे यांच्या या स्वभावामुळे त्यांनी विरोधी पक्षालाही आपलेसे केले. त्यांचे हे कौशल्य पाहून शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्यावर ठाणे जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली. अगदी मनापासून काम करीत राहण्याच्या सवयीने ते यशाचे एक एक पल्ले गाठत होते. त्यांनी शिवसेनेच्या अनेक आंदोलनात भाग घेतला. तुरुंगवास देखील भोगला.

संघटनेत काम करताना स्पष्टवक्तेपणा आणि कामाचा उरक यामुळे त्यांनी आपले संघटन कौशल्य पणाला लावून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका जिंकत भगवा आदिवासी भागापर्यंत फडकविला. जिल्हाप्रमुख या नात्याने शिंदे यांनी आनंद दिघे यांच्यानंतर ठाणे महापालिकेवर एकहाती सत्ता आणि ठाणे जिल्हा परिषदेवर सेनेचा भगवा फडकवण्याची किमया करून दाखवली.

दोन वेळा आमदार झालेल्या या वादळी व्यक्तिमत्त्वाच्या कार्याची दखल जशी पक्षाने घेतली तशी नव्या सरकारनेही घेतली. २००४ पासून ते सलग चौथ्यांदा ठाण्यातून आमदारपदी निवडून आले आहेत. २०१४ मध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री, तसेच ठाण्याचे पालकमंत्री अशा पदांची धुरा सांभाळली. जानेवारी २०१८ मध्ये शिंदे आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री बनले. सध्या ते नगरविकासमंत्री म्हणून क्रियाशील होते. विधिमंडळाच्या बैठकीत आमदार आदित्य ठाकरेंनीच विधिमंडळ पक्षनेते म्हणून

एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता आणि सर्वानुमते त्यांची निवड जाहीर झाली होती. शिवसेनेविरुद्ध बंड पुकारल्यानंतर गेल्या काही दिवसांतील घडामोडी साऱ्या महाराष्ट्राने पाहिल्या. त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळू शकते, अशी साऱ्यांची अटकळ होती. मात्र, आज ते थेट मुख्यमंत्रीच झाले. आजपर्यंत साताऱ्याच्या भूमीने यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण हे तीन मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले. शरद पवार यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील नांदवळ. त्यामुळे तेही या भूमीतलेच म्हणावे लागेल. त्यामुळे एकनाथ शिंदे हे साताऱ्याने दिलेले पाचवे मुख्यमंत्री ठरतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com