Satara : धरणाच्या जलाशयात पोहत जाऊन सुरू केली वीज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara : धरणाच्या जलाशयात पोहत जाऊन सुरू केली वीज

Satara : धरणाच्या जलाशयात पोहत जाऊन सुरू केली वीज

पसरणी : खरोखरीच कमाल तारतंत्रींच्या जिद्द अन् धाडसाची. धरण जलाशयात पोहत जाऊन सुरू केली वीज कृषी पंपांची! होय, ही अविश्वसनीय वाटावी अशी घटना घडली आहे वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील दसवडी गावात. बाह्य स्रोत कर्मचारी विकास सोनावले यांच्या या अजोड कामगिरीचे कौतुक होत आहे.

गेल्या आठवड्यात अधूनमधून कोसळणाऱ्या पाऊसधारा, सोसाट्याचा वारा यामुळे अवघे जनजीवन विस्कळित होत होते. धोम धरणही जवळपास भरण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे पाण्याचा फुगवटा गावकुसापर्यंत. अशातच दसवडीच्या स्मशानभूमीजवळ धरणाच्या जलाशयाच्या आत ५००-६०० मीटर अंतरावर मुख्य वाहिनीची वीजवाहक तार तुटल्याने वाईच्या पश्चिम भागातील कृषी पंपांचा, गावोगावच्या पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित झाला. स्वतःच्या गावात चिखली येथे नेमणुकीस असलेले बाह्य स्रोत कर्मचारी (वायरमन) विकास रामचंद्र सोनावले तुटलेली तार पाहत होते; पण विजेच्या खांबापर्यंत पोचायचे तर धरणाच्या पाण्याचा फुगवटा, आक्राळ- विक्राळ पसारा, साप व अन्य जलचर यांचे भय होते. गवत, झुडपे यातून वाट काढणे आवश्यक होते.

असेच पाच दिवस गेले. काय करावे कळेनासे झाले. शेती पंप व शेतात घराजवळ असलेल्या विंधन विहिरींचा वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक गावांतील लोकांना पावसाळ्यात पिण्याचे पाणी मिळेना. विद्युत वितरण कंपनीच्या विकास सोनवलेंनी सहाव्या दिवशी निर्णय घेतला. अनिकेत खरात, अतुल पार्टे, आकाश मांढरे या सहकाऱ्यांच्या साक्षीने त्यांनी तुडुंब भरलेल्या धोम जलाशयात उडी घेतली आणि तब्बल ६०० मीटर अंतर पोहून जाऊन ते विजेच्या खांबावर चढले. तारेची जोडणी केली अन् तेवढेच अंतर पोहून ते सुखरूप परतही आले. त्यांच्या त्या धाडसी सेवावृत्तीचे छायाचित्रण काठावरील सहकारी करत होते. त्यामुळे विकास यांचे कॅमेऱ्यात न मावणारे, विद्युत वितरण कंपनीचा गौरव, गरिमा वाढविणारे धाडस कौतुकास्पद ठरले!

...अन् पाणी योजना सुरू झाल्या

वीजपुरवठा खंडित असल्याने दसवडीसह मुगाव, चिखली, मालतपूर, धावली, कोंढवली, आकोशी, वयगाव बोरगाव, दह्याट या गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या. ग्रामस्थांचे पाण्याविना हाल सुरू झाले. मात्र, सोनावलेंने धाडसी कामगिरी केल्याने सुरू झालेल्या वीजपुरवठ्यामुळे या गावांच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला.

Web Title: Electricity Dam Swimming 600 Meter Vikas Sonavale Power On Electricity Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..