esakal | कोरेगाव : सातारा-लातूर महामार्गावरील अतिक्रमण हटविले
sakal

बोलून बातमी शोधा

कोरेगाव : सातारा-लातूर महामार्गावरील अतिक्रमण हटविले

टप्प्याटप्प्याने शहरातील अन्य रस्त्याच्या कडेला असलेले अडथळे दूर करण्याचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी दिली.

कोरेगाव : सातारा-लातूर महामार्गावरील अतिक्रमण हटविले

sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांसह वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेता शहरातून जाणाऱ्या सातारा-लातूर महामार्गावरील दुतर्फा अडथळे दूर करण्यास नगरपंचायतीने नुकतीच सुरवात केली आहे. तशा तोंडी सूचना नगरपंचायत प्रशासनाने संबंधित दुकानदार, विक्रेत्यांना दिल्या असून, या सुचनांचे पालन न झाल्यास अडथळे दूर करण्याची मोहीम नगरपंचायत हाती घेणार आहे. टप्प्याटप्प्याने शहरातील अन्य रस्त्यांच्या कडेला असलेले अडथळेही दूर करण्याचे नगरपंचायतीचे नियोजन आहे.

शहरातून जाणाऱ्या सातारा-लातूर महामार्गाच्या दुतर्फा दुकानदार, विक्रेते आपापला माल दुकानाच्या बाहेर लावतात. परिणामी गर्दीच्या वेळी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर पार्कींगचाही प्रश्न निर्माण होतो आणि पादचाऱ्यांसह वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. आता दिवाळी तोंडावर असल्याने खरेदीसाठी होणारी गर्दी व वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावरील अडथळे हटविण्याच्या तोंडी सूचना मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी स्वत: फिरून संबंधित दुकानदार, विक्रेत्यांना दिल्या आहेत.

भाजप नगरसेविकेवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल 

संबंधितांनी स्वत:हून हे अडथळे दूर करावेत, असा त्यामागचा नगरपंचायत प्रशासनाचा हेतू आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी घाडगे यांनी सांगितले, की तोंडी सुचनांचे पालन दोन दिवसांमध्ये संबंधित न केल्यास लेखी नोटीस बजावली जाईल. त्यानंतरही परिस्थितीमध्ये फरक न पडल्यास नगरपंचायतीतर्फे मुख्य रस्त्यावरील अडथळे दूर करण्याची मोहीम राबवली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील अन्य रस्त्याच्या कडेला असलेले अडथळे दूर करण्याचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी घाडगे यांनी दिली.

कोल्हापुरातील बिंदू चौक-बुरुज आणि‌ तटबंदी

Edited By : Siddharth Latkar