
कऱ्हाड : शहरातील कार्वे नाक्यावरील पाण्याच्या टाकीपासून ईदगाह मैदानाकडे जाणाऱ्या अंतर्गत गोळेश्वर पाणंद हा रस्ता झोपडपट्टीच्या अतिक्रमणामुळे गुदमरत आहे. झोपडपट्ट्या हटत नसल्याने रहिवासी सुविधांपासून वंचित आहेत. अनेकांवर तेथून स्थलांतर होण्याची वेळ आली आहे. कॉलन्यांतील लाेक पालिकेकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आठ वर्षांत दोनदा अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न झाला अन् तो फसलाही. त्या भागातील नागरिकांनी पुन्हा एकदा झोपडपट्टी हटविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पालिका आता तरी झाेपडपट्टी हटवण्यात यशस्वी होणार का? हा प्रश्न आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे झोपड्यांच्या अतिक्रमणाचाही प्रश्न जटिल बनत आहे.