सरपंच प्रशिक्षण शिबिराच्या तक्रारीचे बीडिओंकडून खंडन

राजेंद्र वाघ
Wednesday, 25 November 2020

सुरेश येवले यांच्या तक्रारीसंदर्भात अहवाल सादर करण्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंचायत समितीने पाठवलेल्या स्वयंस्पष्ट अहवालात या तक्रारीतील सर्व 15 मुद्‌द्‌यांवर स्वतंत्रपणे अभिप्राय नोंदवला आहे. यासंदर्भात पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधला असता, यासंदर्भातील तक्रारीत तथ्य नसल्याचे गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी सांगितले.

कोरेगाव : कोरेगाव पंचायत समितीच्या वतीने सन 2018- 19 मध्ये आयोजिलेल्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या प्रशिक्षण शिबिरासाठीच्या आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता व गैरव्यवहार झाल्याची तक्रार येथील एका नागरिकाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
याप्रकरणी जिल्हा परिषदेने पंचायत समितीकडून अहवाल मागवला आहे. दरम्यान, वरिष्ठ कार्यालयाने चौकशी करणे अपेक्षित असताना ज्या कार्यालयाशी निगडित तक्रार आहे. त्याच कार्यालयाने अहवाल तयार करून दिल्यावर न्याय कसा मिळणार? असा सवाल तक्रारदाराने उपस्थित केला आहे.
 
यासंदर्भात सुरेश येवले (रा. कोरेगाव) यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे, की जिल्हा परिषदेने डिसेंबर 2018 मध्ये शिबिराच्या आयोजनाचे आदेश दिले आणि सात जानेवारी 2019 पासून कोरेगाव पंचायत समितीमध्ये प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ झाला. जानेवारीमध्ये प्रत्येकी तीन दिवसांच्या तीन शिबिरांचे आणि फेब्रुवारी 2019 मध्ये क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण शिबिरांतर्गत प्रत्येकी तीन दिवसांच्या तीन शिबिरांचे आयोजन केले होते. शिबिरासाठी लागणारे साहित्य, भोजन, चहा, नाष्ट्याच्या व्यवस्थेसाठी निविदा मागवण्याबाबतचे जाहीर प्रसिद्धीकरण न करता पाच तारखेला ठराविक दुकानदारांना पत्र देऊन दरपत्रकाची मागणी केली.

अमेरिकेत भारताच्या सुपुत्रांची हवा! नासात हवामान अभ्यासासाठी आर्य, शिवराजची निवड 

या सर्व निविदा एकाच दिवशी सहा तारखेला घेऊन सात तारखेला उघडल्या असून, त्यावर निविदा उघडल्याची वेळ नमूद नाही, एकाही दरपत्रकावर आवक नंबर नमूद नाही आणि घेतलेल्या निविदा, पाकिटांवर, खर्च पावत्यांवर बऱ्याच ठिकाणी एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर आहे. मूळचा दर कमी असताना नंतर खाडाखोड करून दर वाढवले आहेत. शिबिर सात तारखेला सकाळी दहा वाजता सुरू झाले आणि त्याच दिवशी सकाळी 11 वाजता निविदा उघडल्या आणि मंजुरीही दिली. मग साहित्य, भोजन, चहा, नाष्टा कधी आले आणि त्याचे वाटप कधी झाले. जिल्हा परिषदेची स्वत:ची प्रिंटिंग प्रेस असताना शिबिरार्थींना दिलेली प्रमाणपत्रे बाहेरून छपाई करून घेण्याचे कारण काय? पंचायत समितीच्या आरोग्य, शिक्षण विभागाकडे लॅपटॉप, प्रोजेक्‍टर असताना हे साहित्य भाड्याने आणून 54 हजारांचा खर्च दाखवला आहे. एकच सदस्य दोन प्रशिक्षणाला हजर असल्याचे दाखवून त्यांच्या नावावरील निधी संगनमताने हडपल्याचा आरोप श्री. येवले यांनी तक्रारीत केला आहे. 

बीडिओंकडून तक्रारीचे खंडन 

सुरेश येवले यांच्या तक्रारीसंदर्भात अहवाल सादर करण्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंचायत समितीने पाठवलेल्या स्वयंस्पष्ट अहवालात या तक्रारीतील सर्व 15 मुद्‌द्‌यांवर स्वतंत्रपणे अभिप्राय नोंदवला आहे. यासंदर्भात पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधला असता, यासंदर्भातील तक्रारीत तथ्य नसल्याचे गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excess Expenses Spend For Sarpanch Parishad Complaint From Citizen In Koregaon Satara News