
कोयना धरणातून वीज प्रकल्पाला अतिरिक्त पाणी
कोयनानगर : पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी कोयना धरणातून दिलेला १० टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा १५ मेपर्यंत संपत असल्याने ऐन उन्हाळ्यात राज्यातील जनतेला वीजटंचाई जाणवू नये, यासाठी धरणातील पाच टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा वीज प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.
कोयना प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांनी ही माहिती दिली. मागील वर्षी कोयना जलविद्युत प्रकल्पातून तीन हजार ९३० मेगावॉट वीजनिर्मिती होवून त्यातून महानिर्मिती कंपनीला ५०० कोटींचे उत्पन्न मिळाल्याचे सांगून श्री. डोईफोडे म्हणाले, ‘‘वीजनिर्मितीसाठी यंदा प्रथमच कोयना धरणातून ८२ टीएमसी पाणीसाठा मिळणार आहे. पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी लवादाने आरक्षित केलेला कोटा २२ एप्रिलला पूर्ण क्षमतेने वापर केल्याने संपला आहे. कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती होत असल्याने भारनियमनाचा भार कमी आहे.
त्यासोबत पश्चिमेकडील वीज प्रकल्प विनाखंडित सुरू राहावा, यासाठी कोयना धरणातून १० टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा पश्चिमेकडील वीज प्रकल्पाला देण्यात आला होता. धरणातून पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी पाणीसाठा वाढवून दिल्याने प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प क्षमतेने सुरू आहे. अतिरिक्त पाणीसाठा वाढवल्याने ३३६ दिवसांत वीजनिर्मिती होणार आहे. धरणाचे तांत्रिक वर्ष पूर्ण होण्यासाठी अजून २९ दिवस शिल्लक आहेत. पश्चिमेकडील वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवल्याने वाढवून दिलेला पाणीसाठा १५ मेपर्यंत पुरेल. पाच टीएमसी वाढवून देण्याच्या केलेल्या मागणीला मान्यता मिळाली आहे.
धरणात सध्या ३७.४६ टीएमसी पाणीसाठा आहे. महानिर्मिती कंपनीने पाणीसाठा वाढवून देण्याच्या मागणीला जलसंपदा विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. धरणातून १५ टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी देण्यात आला आहे. ३१ मे रोजी तांत्रिक वर्षपूर्ती होणार आहे. यावर्षी धरणातून ८२ टीएमसी पाणीसाठ्याचा वापर वीजनिर्मितीसाठी होणार आहे.
Web Title: Excess Water Koyna Dam Power Project Department Water Resources Decided Provide Five Tmc Additional Water Power Project
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..