मराठाबरोबर धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार?; माळशिरसमध्ये महत्वपूर्ण बैठक

रुपेश कदम
Monday, 28 September 2020

धनगर समाजाची आर्थिक, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती अत्यंत हलाखीची व बिकट आहे. समाजाची उन्नती होण्यासाठी यापूर्वीच महाराष्ट्राच्या यादीत धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश आहे. तथापि, "धनगर'ऐवजी "धनगड' असा उल्लेख झाल्यामुळे समाजाला आरक्षणाचे फायदे मिळू शकत नाहीत.

दहिवडी (जि. सातारा) : मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणासाठी धनगर आरक्षण कृती समिती प्रयत्नशील असून या अनुषंगाने माळशिरसमध्ये झालेल्या बैठकीत एक ऑक्‍टोबरला तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

माळशिरस येथे धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ होण्याबाबत दिशा ठरवण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेनुसार आगामी काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे सर्वानुमते ठरले. त्यानुसार एक ऑक्‍टोबरला महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर राज्याचे प्रमुख नेते शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कृती समितीच्या नेत्यांनी वेळ घेऊन धनगरांचा प्रश्न सोडविण्यासाठी आग्रह धरावा, असेही ठरले.

कन्या दिवस : मुलीच्या नावाने उघडा खाते, ती 21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख
 
धनगर समाजाची आर्थिक, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती अत्यंत हलाखीची व बिकट आहे. समाजाची उन्नती होण्यासाठी यापूर्वीच महाराष्ट्राच्या यादीत धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश आहे. तथापि, "धनगर'ऐवजी "धनगड' असा उल्लेख झाल्यामुळे समाजाला आरक्षणाचे फायदे मिळू शकत नाही. ही दुरुस्ती होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या आदिवासींच्या यादीमध्ये अनुक्रमांक 36 वर "धनगड'ऐवजी "धनगर' अशी दुरुस्ती केंद्राने करण्याबाबतची शिफारस करावी. 

आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा : उदयनराजे

केंद्र सरकारने या दुरुस्तीबाबतचे बिल तयार करून संसदेमध्ये मंजूर करावे किंवा संसदेत सादर झालेल्या 325 क्रमांकाच्या बिलामध्ये ही दुरुस्ती टाकून बिल मंजूर करावे. या दुरुस्तीबाबत राष्ट्रपतींच्या मान्यतेने अध्यादेश त्वरित काढण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुभाष पाटील खेमनर होते. या बैठकीला दादासाहेब काळे, परमेश्वर कोळेकर, डॉ. मारुतीराव पाटील, बजरंग नाना खटके, गणपतराव वाघमोडे, शिवाजीराव ईजुगडे, विठ्ठल पाटील, शिवाजीराव पाटील, पांडुरंग वाघमोडे, विष्णू देशमुख, बजरंग गावडे, पंकज देवकाते, अमोल खरात, किरण गोफणे उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Executive Meeting Of Dhangar Reservation Action Committee At Malshiras Satara News