कोयना विकासाचा ‘शिवसागर’ व्हावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Expectation of development of Koyna division from Chief Minister Eknath Shinde

कोयना विकासाचा ‘शिवसागर’ व्हावा

कास - राज्याच्या सर्वोच्च मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची अनपेक्षितपणे संधी मिळाली आहे. दुर्गम, संपर्कहिन अशा दरे गावचा सुपुत्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्याच्या आभिमानाने कोयना विभागाला आनंद झाला आहे. याच भागातील भूमिपुत्रांकडून आपला हक्काचा माणूस मुख्यमंत्री झाल्याने अतिदुर्गम असलेल्या या भागाच्या दुर्गमतेचा शिक्का पुसून विकासाचा शिवसागर जलाशय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोयना धरणामुळे शंभर टीएमसीचा पाणीसाठ्याचा शिवसागर जलाशय तयार झाला. त्याचा फायदा महाराष्ट्राला झाला. स्थानिक भूमिपुत्र मात्र अडचणीत आले. गावांचे पुनर्वसन झाले. काही गावे वर सरकून तिथेच राहिली. निम्मी लोकसंख्या पुनर्वसनामुळे भाग सोडून बाहेर गेली. जलाशयाच्या अलीकडे-पलीकडे भाग तयार झाले. यात मुख्यतः रस्त्यावर असलेला बामणोली भाग तर तापोळ्याच्या अलीकडे सोळशी नदीकाठी गोगवे, लाखवड हा विभाग तर पलीकडे कोयना नदीच्या काठावरील पाली, त. आटेगाव हा पट्टा. यात सर्वांत दुर्गम खोरे तयार झाले. ते खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांचे गाव असलेले दरे त. तांब पासून सुरू होणारे कांदाटी खोरे.

कोयना, सोळशी व कांदाटी या तिन्ही भागांचा विचार करता मूलभूत सोयी-सुविधा या जेमतेमच आहेत. याच भागातील सामान्य व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याने ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीसारखा या भागाचाही चेहरामोहरा बदलावा, अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसते. आतापर्यंत काढलेल्या हालअपेष्टा संपवून विकासाचे नवे पर्व सुरू होणारच असल्याचे लोक ठामपणे बोलत आहेत.

या भागाच्या विकासाचा विचार करता पर्यटनवाढ हाच येथील मुख्य मुद्दा आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून संबोधला जाणारा तापोळा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. बामणोली, मुनावळे, शेंबडी, तापोळा, वानवली या ठिकाणी असणारे बोट क्लबच्या माध्यमातून पर्यटक येतात. स्थानिक लोकांनी टेंट हाउस, हॉटेलच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती केली आहे. मात्र, त्याला शासकीय पाठबळाची मोठी गरज आहे. अत्याधुनिक रस्ते, शिवसागर जलाशयावरती पूल, नवीन पर्यटन संकल्पना आदी गोष्टी झाल्यास बारमाही पर्यटन वाढून संपूर्ण भागाचा विकास होईल.

...अशा आहेत अपेक्षा

  • जगप्रसिद्ध कास पठार, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली, सह्याद्रीनगर ते चकदेव, पर्वत हा सह्याद्रीच्या डोंगररांगांतील सर्व स्थळे पुणे बंगळूर महामार्ग व साताऱ्याहून रस्ता मार्गाने जोडल्यास जावळी, साताऱ्याच्या विकासाला गती.

  • तापोळा-अहिर प्रस्तावित पूल लवकर होऊन त्याला असणारी काचेची प्रेक्षागॅलरी व्हावी.

  • आपटी-तापोळा पूल झाल्यास बामणोली भाग रस्ते मार्गाने तापोळा, महाबळेश्वरला जवळून जोडल्याने दळणवळण वाढेल.

  • पावशेवाडी (बामणोली) ते दरे त. तांबपर्यंत पूल झाल्यास सातारा, मेढा भाग कांदाटी खोऱ्याशी जोडला जाईल. तेथून कोकणात खेडला जाणे शक्य होईल. कोकणात जाणाऱ्या नवीन मार्गामुळे पर्यटनाला चालना मिळेल.

  • मुनावळे वाघळी येथे शिवसागर जलाशयात होणाऱ्या स्कुबा डायव्हिंग प्रकल्प लवकर व्हावा.

  • परिसरातील पर्यटनस्थळांचा विकास व्हावा.

  • महाबळेश्वर-तापोळा, सातारा-बामणोली-गोगवे, पाचवड-मेढा-बामणोली, पार घाट-अहिर-दरे ते कांदाटी खोऱ्यातील लामज-उचाट ते शिंदी वलवन आदी रस्ते मोठे व पक्के व्हावेत.

Web Title: Expectation Of Development Of Koyna Division From Chief Minister Eknath Shinde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top