
-सिद्धार्थ लाटकर
सातारा : शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) काढण्याच्या प्रक्रियेची गतिमान व्हावी, यासाठी नागरी सुविधा केंद्रांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. सुमारे १०० फार्मर आयडी व्हावेत, यासाठी त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याने सध्या गावागावापासून शहर परिसरातील सीएससी केंद्रचालक शेतकऱ्यांच्या शोधात आहेत. अन्य कामासाठी आलेल्या नागरिकांना (शेतकऱ्यांना) त्यांच्याकडे शेती आहे का? अशी विचारणा केली जात आहे. हा क्रमांक का काढावा, याची माहिती दिली जात आहे. त्यातून सीएससी केंद्र चालकांकडे शेतकरीही नोंदणीसाठी येताहेत. यामुळे शहरातील विविध शासकीय सुविधा देणाऱ्या केंद्रावरही शेतकऱ्यांची वर्दळ दिसू लागली आहे.