ग्राहकाला हसवतोय अन् शेतकऱ्याला रडवतोय कांदा!

ग्राहकाला हसवतोय अन् शेतकऱ्याला रडवतोय कांदा!

सातारा : केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला. ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचं परिपत्रकही काढण्यात आलं. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढू लागले होते. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने ही निर्याबंदी लागू केली आहे.

कांदा निर्यात बंदीनंतर नाशिकमधल्या लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावाला सुरुवात झालेली नाही. कांदा लिलाव सुरू करायचे की नाही यावर व्यापाऱ्यांची बैठक सुरु आहे. बैठकीत काय निर्णय होतो याकडे शेतकऱ्यांचा डोळे लागले आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. इथल्या शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था ही कांद्यावर अवलंबून आहे. सध्या भरपूर प्रमाणावर कांदा शेतकऱ्यांकडे पडून आहे. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कांदा हा निर्यातीसाठी सीमेवर अडकून पडला आहे. कांद्याच्या किंमती खूप वाढल्या नसून अजूनही सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात असल्याने तातडीने निर्यात बंदी उठवने गरजेचं आहे. 

आज कोरोना व इतर कारणांमुळे आवक कमी झाल्यामुळे कांदा आणि टोमॅटो चांगलाच भाव खाऊ लागला आहे. किरकोळ स्वरूपात कांद्याची विक्री ४० रुपये किलोने होत आहे. तर चांगल्या टोमॅटोचा दर ५० ते ६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सातारा बाजार समितीत तर कांदा व बटाट्याचे दर तेजीत निघाले. सातारा शेती उत्पन्न बाजार समितीत सातारा, जावळी, कोरेगाव, वाई, खटाव, लोणंद आदी तालुक्यातून भाजीपाला येत असतो. दर रविवारी तर आवक मोठ्या प्रमाणात होत असते. 

सातारा बाजार समितीत रविवारी वांग्याची २७ क्विंटल आवक झाली, तर १० किलोला दर १०० ते १५० रुपयादरम्यान मिळाला. टोमॅटोची ७० क्विंटल आवक झाली. याला १० किलोला दर ३०० ते ३५० रुपयांपर्यंत मिळाला. कोबीची २१ क्विंटल आवक होऊन दर १०० ते १५० रुपये निघाला. तसेच दोडक्याची १८ क्विंटल आवक झाली. याला १० किलोला २५० ते ३०० रुपये दर मिळाला. कारल्याची २१ क्विंटल आवक होऊन २५० ते ३२० रुपये दर १० किलोला मिळाला.

बाजार समितीत नवीन कांद्याची ९६ क्विंटल आवक होऊन दर १५० ते २२० रुपये १० किलोला मिळाला. बटाट्याचाही दर तेजीत निघाला. बाजार समितीत अवघी ५ क्विंटल बटाटा आला. याला १० किलोला २५० ते ३०० रुपये दर मिळाला. वाटण्याचाही दर तेजीत आहे. ९ क्विंटलची आवक होऊन १० किलोला एक हजार ते १२०० रुपये दर निघाला. पावट्याला मात्र १५० ते २०० रुपये दर आला. पावट्याची ४१ क्विंटल आवक झाली. 

गवारलाही ३०० ते ३५० रुपये भाव १० किलोला मिळाला. दरम्यान, बाजार समितीपेक्षा मंडई, दुकानात सर्वच भाजीपाल्याचे दर अधिक असतात. मंडई व दुकानात मोठा कांदा ३० ते ४० रुपये किलोने विकला जात आहे. गेल्या आठवड्यापेक्षा कांद्याचे दर वाढले आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर वाढले आहेत. आवकही ते कमी होत आहे. ५० ते ६० रुपये किलोने टोमॅटो विकला जात आहे. पालेभाज्यांचे शेकड्याचे दर : कोथिंबीर - ३००-१२००,  मेथी १४००-१८००, शेपू ४००-८००, कांदापात ८००-१२००, चाकवत ५००-८००, करडई -५००-६००, पुदिना - ३००-६००, अंबाडी -५००-८००, मुळे १५००-२५००, राजगिरा - ८००-१०००, चुका ८००-१०००, चवळई -८००-१२००, पालक ८००-१२०० असे दर पहायला मिळत आहेत.

फुलांचे प्रतिकिलोचे दर झेंडू : ५-१०, गुलछडी : १०-३०,  सुट्टा कागडा - ४०-६०, कापरी : १०-२०, शेवंती : २०-४० (गड्डीचे भाव)  गुलाबगड्डी : ५-१०, गुलछडी काडी : ५-१०, डच गुलाब (२० नग) : १०-३०,  लिलि बंडल : १०-१२ जर्बेरा : ५-१० असे आहेत. फळांचा बाजार : लिंबे (प्रति गोणी) : २००-३००, मोसंबी : (३ डझन) : १००-२३०, (४ डझन ) : २५-१२०, संत्रा : (३ डझन) : १००-२००  (४ डझन) - ३०-१००,  डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-१००, गणेश : १०-५० आरक्ता २५-६०. कलिंगड : १०-२०, खरबूज : १०-३०, पपई : ५-२०, सीताफळ - १०-१४० या फळांच्या दरातही चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे. 

दरम्यान, कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून सरकारने यावरती पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे. कांद्याचं उत्पादन करणारा शेतकरी हा गरीब आहे. कोरोना काळात खरं तर संपूर्ण देशाला सावरण्याचे काम शेतकऱ्यानी केलं आहे. संपूर्ण देशाला अन्नधान्य आणि भाजीपाल्याची कमतरता भासू दिली नाही. आज जगभरात कांद्याला मोठी मागणी आहे, अशावेळी निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हजारो टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे. जेव्हा भाव कोसळतात, तेव्हा कांदा फेकावा लागतो. पण, आज कांद्याला चांगला भाव मिळत असताना असा निर्णय घेणे यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com