
सातारा : निधीअभावी लॉटरी न निघाल्याने कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेला प्रतिसाद मिळत नाही. वेळेत लॉटरी न काढल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीपासून कृषी विभागाला मिळालेले योजनेचे उद्दिष्टही पूर्ण झालेले नाही. २०२४-२५ मध्ये ४९९ शेततळ्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत केवळ ३८ शेततळी तयार झाली आहेत. त्यांना २२.५४ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
मागेल त्याला शेततळे योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, यातून शेतकऱ्यांना शेततळे तयार करण्यासाठी शासन अनुदान देते. या अनुदानाचा वापर करून प्रत्येक शेतकरी शेततळे बांधून शेतीला पाणीपुरवठा करू शकणार आहे. यातून पाण्याविना पिके वाया जाऊ नयेत, शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळावे, हा यामागचा उद्देश होता.