
आमदार अमोल मिटकरींवर गुन्हा दाखल करा; ब्राम्हण बहुभाषिक संघाची मागणी
कऱ्हाड : लोक प्रतिनिधी असतानाही आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदू देवता व हिन्दू समाजातील पुरोहित -ब्राह्मण समाजाबाबत बेताल,खोटे वक्तव्य करुन समाजात तेढ व वैमनस्य वाढवण्याचा प्रय़त्न केला आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी येथील ब्राम्हण बहुभाषिक संघाने आज पोलिसांनी निवेदनाव्दारे केली. विद्यानगर, आगाशिवनगर, येथील बहुभाषिक ब्राह्मण संघासह येथील चित्पावन ब्राह्मण संघ. वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळ, ऋग्वेद स्वाहाकार समिती, ब्राह्मण बहुद्देशीय चॅरिटेबल फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार मेटकरी यांनी वक्तव्य केले त्यावेळी व्यासपीठावर मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंढेही उपस्थीत होते. त्यांच्यासह सभा आय़ोजकांवरही कारवाईची मागणी संघाने निवेदनाव्दारे केली आहे.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व आमदार अमोल मिटकरी यांनी १९ एप्रिल २०२२ रोजी सांगली येेथे पक्षाच्या जाहीर सभेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंढे,यांच्यासह असंख्य लोकांच्या उपस्थितीत जाहीरपणे वक्तव्य करताना हिन्दू धर्मियांचे श्रध्दा स्थान असलेल्या रामभक्त हनुमान स्तोत्र म्हणताना मारुती स्तोत्र व हनुमान चालिसा यांचे मिश्रित अभद्र भाषेत टिका टिप्पणी केली. हिन्दू देवांसह श्रध्देचा अवमान करुन जाती धर्मात तेढ वाढवून वितुष्ट निर्माण केले आहे. परंपरागत हिन्दू विवाह पध्दतीवर टीका केली. कन्यादान हिन्दू संस्कार पध्दतीवर गलिच्छ टीका केली आहे. हिंदू धर्मातील संस्काराचे विधीवर खोटी व गलिच्छ बेताल टीका करुन हिन्दू धर्मियांत तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य केले आहे.
वास्तविक कोणत्याही विधीशिवायही प्रेम विवाह होतातच मात्र तरिही जाणीवपूर्वक तेढ निर्माण केला आहे. मोघमपणे समाजात तेढ वाढविण्यासाठीच फक्त काही वक्तव्य केली जात आहेत. सभेत मंत्री जयंत पाटील व मंत्री धनंजय मुंडे हजर असतानाही निषेध किंवा कारवाईचे आदेश दिलेले नाहीत. उलट त्या वक्तव्यास हसून दाद दिली आहे. तरी पोलिसांनी सांगली येथील भाषणाची विविध फेसबूक वा व्हॉट्सअप ग्रूपवर आलेली व्हिडिओ क्लिप तपासून आमदार मिटकरी यांच्यासह सभा आयोजक आणि सदर सभेत हजर राहून कोणतिही कारवाई न करता तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यास दाद देणाऱ्या मंत्री जयंत पाटील व धनंजय मुंडे यांच्या विरुध्द भारतीय दंड संहितेनुसार उचित कारवाई त्वरीत करावी.
Web Title: File Charges Against Mla Amol Mitkari Demand Brahmin Multilingual Association
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..