
कऱ्हाड (जि. सातारा) : मनोरंजनातून लोकप्रबोधन करणारे तमाशा फडमालक व कलावंतांना कोरोनामुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. गर्दीच्या ठिकाणांवर शासनाने बंदी घातल्याने यंदा जत्रा-यात्रांचा हंगाम झाला नाही. त्यामुळे फडमालक व कलावंतांवर हंगामासाठी सावकारांकडून कार्यक्रमांच्या खर्चासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. कार्यक्रम बंद असल्याने अनेक जण मोलमजुरीची कामे करत आहेत. मात्र, त्यांच्यापुढे सावकरांचे कर्ज कशातून फेडायचा हाच मोठा प्रश्न उभा आहे. त्यामुळे ते हतबल झाले असून, शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील पूर्वी प्रसिद्ध असणारी ही कला अलीकडच्या माहिती, तंत्रज्ञानाच्या आणि टीव्हीच्या आक्रमणामुळे लुप्त होण्याच्या मार्गावर आली आहे. मात्र, अजूनही ही कला जिवंत ठेवण्यासाठी तमाशा कलावंत, फडमालक प्रयत्न करत आहेत. दर वर्षी जत्रा-यात्रांच्या हंगामात मनोरंजनासाठी तमाशाचा कार्यक्रम ठेवला जातो. तमाशा फडमालकांकडे गहाण ठेवण्यासाठी काहीच नसल्याने बॅंका त्यांना कर्जासाठी उभ्या करत नाहीत. त्यामुळे दर वर्षी ते खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतात.
तमाशा कलावंतांना अगोदरच ऍडव्हॉन्समध्ये एक ते दीड लाखाची उचल, कार्यक्रमासाठी दर्जेदार साहित्य, वाद्ये, लायटिंगसह अन्य वस्तूंची खरेदी करावी लागते. हा सर्व खटाटोप केल्यानंतर तमाशाचा फड उभा राहतो. त्यातूनही अनेकदा नैसर्गिक संकटामुळे कार्यक्रम रद्द होतात. त्याचाहा भुर्दंड फडमालकांवरच येऊन पडतो. दर वर्षी हाच रिवाज असतो. यंदा चांगला हंगाम साधेल या अपेक्षाने फडमालकांनी सावकारांकडून कर्ज घेतले. कार्यक्रम सुरू झाले. मात्र, ऐन जत्रा-यात्रेच्याच हंगामात मार्च महिन्यात कोरोना आला. या महामारीच्या आजारावर आजपर्यंत औषध उपलब्ध नाही. त्यासाठी सध्यातरी सोशल डिस्टन्सिंग एवढाच पर्याय आहे.
याचा विचार करून शासनाने गर्दीच्या ठिकाणचे कार्यक्रम, जत्रा-यात्रा, उत्सव बंद केले. त्याचा मोठा फटका या तमाशा मंडळांना बसला. सावकाराकडून घेतलेले पैसे साहित्य, कलाकारांची उचल, वाहनभाडे यासाठी खर्च झाले आणि हंगामही साधला नाही. त्यामुळे सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचा डोंगर तमाशा फडमालकांसमोर उभा आहे. कार्यक्रम बंद असल्याने अनेक जण मोलमजुरी करून जगत आहेत. त्यातून त्यांची रोजीरोटी भागत आहे. मात्र, सावकारांचे कर्ज कशातून फेडायचा हाच मोठा प्रश्न त्यांच्यापुढे असल्याने ते हतबल झाले आहेत. त्यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणीही फडमालकांनी केली आहे.
महाराष्ट्रातील तमाशा फडमालकांना सावकारांनी कर्ज दिले हे आमच्यावर उपकारच आहेत. मात्र, यंदा कोरोनामुळे कार्यक्रमच झाले नाहीत. याला फडमालकांचा दोष काय? त्यांनी परिस्थितीचा विचार करून पैशासाठी थांबावे. शासनानेही तमाशा फडांना तातडीने अनुदान द्यावे. त्यातून सावकारांची कर्ज भागवता येतील.
-संभाजीराजे जाधव, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय तमाशा परिषद
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.