साताऱ्यात कोरोनाच्या विनाशासाठी क्ष-किरण वैज्ञानिक अधिकाऱ्याने टोचून घेतली पहिली लस!

उमेश बांबरे
Saturday, 16 January 2021

कोरोना संसर्गामुळे देशाबरोबर राज्याचे अर्थचक्र थांबले. अनेकांचे प्राण गेले, त्याचबरोबर सर्वांनाचा याचा त्रास झाला. आज देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे.

सातारा : जिल्ह्याला कोविड लसीचे 30 हजार डोस उपलब्ध झाले असून आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थिती लसीकरणास सुरवात झाली. पहिली लस जिल्हा रूग्णालयातील क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी बाळासाहेब विष्णू खरमाटे यांना देण्यात आली. 

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष माधवी कदम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते. कोरोना संसर्गामुळे देशाबरोबर राज्याचे अर्थचक्र थांबले. अनेकांचे प्राण गेले, त्याचबरोबर सर्वांनाचा याचा त्रास झाला. आज देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा कार्यक्रमाचा प्रारंभ होत आहे. यामुळे देशासह राज्यात आज उत्साहाचे वातावरण असून लसीमुळे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असल्याची भावना पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली. 

कोरोना लसीचा चांगला परिणाम जनमानसांत दिसेल; गृहराज्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

पहिली लस घेतलेले बाळासाहेब खरमाटे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, लसीकरणाचा लाभ मला आज मिळाला. त्याबद्दल मला आनंद वाटत आहे. मला कसलाही त्रास जाणवत नाही. यापुढे कोरोना मुक्तीसाठी आणखीन जोमाने काम करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, कराड येथील जिल्हा रुग्णालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा प्रारंभ झाला.

कृष्णा हॉस्पिटल कोविशिल्ड लसीचे महत्त्वाचे केंद्र : डॉ. भोसले

यावेळी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तर फलटणला आमदार दीपक चव्हाण यांच्या उपस्थितीत लसीकरणास सुरवात झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या जिजामाला रणजितसिंह नाईक-निंबाळकर उपस्थित होत्या. तसेच वाईत आमदार मकरंद पाटील, कोरेगावात आमदार महेश शिंदे तर दहिवडीत आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत लसीकरणास प्रारंभ झाला आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The First Corona Vaccine Was Given To Balsaheb Kharmate In Satara