esakal | वहागावात पाच वर्षांच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

वहागावात पाच वर्षांच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू

या घटनेची नोंद तळबीड पोलिसात झाली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वहागावात पाच वर्षांच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू

sakal_logo
By
तानाजी पवार

वहागाव (जि. सातारा) : दुचाकीवर समोर बसलेल्या पाच वर्षीय मुलाने अचानक ऍक्‍सिलेटरची मूठ ओढल्यामुळे पिता- पुत्र दुचाकीसह विहिरीत कोसळले. या दुर्घटनेत मुलाचा बुडून मृत्यू झाला, तर त्याचे वडील जखमी झाले. वहागाव (ता. कऱ्हाड) येथे नुकतीच घटना घडली. वरद विक्रम पवार (वय 5, रा. वहागाव) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे, तर विक्रम ऊर्फ भरत पवार हे किरकोळ जखमी झाले आहेत.
 
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वहागाव येथील विक्रम पवार हे दुचाकीवरून शेतात निघाले होते. त्या वेळी मुलगा वरद हा दुचाकीवरून येण्यासाठी वडिलांच्या मागे लागला. त्याने हट्ट धरल्यामुळे विक्रम यांनी वरदला दुचाकीवर समोर घेतले. ते शेताकडे निघाले असताना वाटेत अचानक वरदने ऍक्‍सिलेटरची मूठ ओढली. त्यामुळे दुचाकी गतीने रस्त्यानजीक असलेल्या विहिरीत कोसळली. विक्रम हे दुचाकीखाली सापडल्यामुळे त्यांना त्वरित बाहेर पडता आले नाही. त्यादरम्यान वरद पाण्यामध्ये बुडाला. काही वेळात आपली सुटका करून घेऊन विक्रम दुचाकीखालून बाहेर पडले.

लग्नाअगोदर बारसे घालायची अनेकांना घाई; जयकुमार गाेरेंचा राष्ट्रवादीला टाेला

त्यांनी वरदला बाहेर काढले, तसेच आरडाओरडा केला. त्या वेळी शिवारात शेतात काम करणारे शेतकरी त्याठिकाणी धावले. त्यांनी तातडीने वरद आणि विक्रम यांना उपचारार्थ रुग्णालयात हलवले. मात्र, तत्पूर्वी वरदचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद तळबीड पोलिसात झाली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar