पोलिस तपास सुरु; सांगली, कोल्हापूरातील पूरग्रस्तांची लाखाेंची मदत गायब

राजेंद्र वाघ
Sunday, 27 September 2020

गेल्या 18 तारखेला आयडीबीआयच्या कोरेगाव शाखेतील कामगार संघाच्या बॅंक खात्यामध्ये दोन लाख 20 हजारांचा रोख भरणा करून बॅंक खात्यातील शिल्लक रक्कम जुळवली. 

कोरेगाव (जि. सातारा) : जरंडेश्‍वर शुगर मिलमधील मृत कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत न करता त्याच्या नावे कारखान्याकडून जमा झालेल्या रकमेतून दोन लाख 20 हजारांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी जरंडेश्‍वर साखर कामगार संघाचे उपाध्यक्ष आदिनाथ अनभुले व सरचिटणीस दुष्यंत शिंदे यांच्या विरोधात नुकताच काही दिवसांपुर्वी कोरेगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी दोघांचीही रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, जरंडेश्वर कामगार संघाचे कार्यालय व बॅंक खाते पोलिसांनी सील केले आहे.
 
पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले की, जरंडेश्‍वर शुगर मिलमध्ये पॅनमन म्हणून काम करणारे संजय गणपत कदम यांचे गेल्या जानेवारीमध्ये निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी जरंडेश्‍वर साखर कामगार संघाने कारखान्याकडे कामगारांचा एक दिवसाचा पगार कपात करून देण्याची विनंती पत्राद्वारे केली होती. त्यानुसार कारखान्याचे सरव्यवस्थापक विजय जगदाळे यांनी सात मार्च 2020 रोजी कामगारांच्या एका दिवसाच्या पगाराची चार लाख 29 हजार 136 एवढी रक्कम कपात करून तेवढ्या रकमेचा धनादेश जरंडेश्‍वर साखर कामगार संघाच्या नावे दिला. धनादेश कामगार संघाच्या आयडीबीआय बॅंकेच्या कोरेगाव शाखेतील खात्यामध्ये जमा झाल्यानंतरदेखील कदम यांच्या कुटुंबीयांना दिली नाही. त्यावर मृत कामगार संजय यांचे वडील गणपत नामदेव कदम यांनी 23 जुलै 2020 रोजी कारखान्याचे सरव्यवस्थापक जगदाळे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. ही तक्रार येताच कारखाना कामगार संघाने बनावटपत्र तयार करून त्यावर शुगर मिलच्या बारनिशीमधील आवक रजिष्टरचा शिक्का घेतला आणि 20 मार्च 2020 ही खोटी तारीख घालून ते पत्र कामगारांच्या व्हॉट्‌सऍपरवर व्हायरल केले.

कृषी विधेयक मागे न घेतल्यास आंदोलन; बळिराजा शेतकरी संघटनेचा इशारा 

या पत्रामध्ये "पॅनमन संजय कदम यांनी मृत्यू होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता आणि तो शुगर मिल व्यवस्थापनाने मान्यही केला होता. त्यामुळे कदम यांच्या नावे कामगारांचा एक दिवसाचा पगार कपात केला असला, तरी तो कदम यांच्या कुटुंबीयांना न देता टेलिफोन ऑपरेटर विभागातील मृत कर्मचारी विश्‍वजित काकासाहेब बर्गे यांच्या कुटुंबीयांना दिला जाणार आहे',असे नमूद केले होते. त्यानंतर 11 ऑगस्ट 2020 रोजी कामगार संघाचे सहसचिव राजेंद्र गोरखनाथ फंड यांनी आयडीबीआय बॅंकेच्या कोरेगाव शाखेतील कामगार संघाच्या बॅंक खात्यातून रोख दोन लाख 20 हजार एवढी रक्कम काढली. मात्र, ही रक्कम कदम अथवा बर्गे यापैकी कोणत्याही कामगाराच्या कुटुंबीयांना दिली नाही. त्यावेळी बॅंक खात्यामध्ये दोन लाख 71 हजारांची शिल्लक राहिली होती.

साताऱ्यातील मूकमोर्चा स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांच्या चर्चेअंती निर्णय

दरम्यान, दहा सप्टेंबर 2020 रोजी कारखान्यातील 166 कायम कामगारांनी युनियनने केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराबद्दल व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यावर शुगर मिलच्या व्यवस्थापनाने शहानिशा केल्यावर कामगार संघाने व्हायरल केलेले "ते' पत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी बारनिशी विभागातील संबंधित लिपिकाकडून खुलासा घेतला असता, पत्रावरील नमूद तारखेदिवशी संबंधित लिपिक रजेवर असल्याने कामावर नव्हता. त्या पत्रावर माझी स्वाक्षरी नाही, ते पत्र आवक झालेले नाही, असेही लिपिकाने स्पष्ट केले. त्यानंतर सरव्यवस्थापक जगदाळे यांनी गेल्या 15 तारखेला पोलिस ठाण्यात जरंडेश्‍वर साखर कामगार संघाचे उपाध्यक्ष आदिनाथ अनभुले व सरचिटणीस दुष्यंत शिंदे यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार अनभुले व शिंदे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आणि दोघांनाही अटक झाली. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास सुरू झाल्याचे समजताच फंड याने गेल्या 18 तारखेला आयडीबीआयच्या कोरेगाव शाखेतील कामगार संघाच्या बॅंक खात्यामध्ये दोन लाख 20 हजारांचा रोख भरणा करून बॅंक खात्यातील शिल्लक रक्कम जुळवली. 

पूरग्रस्तांनाही मदत नाही 

गेल्यावर्षी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जरंडेश्‍वर साखर कामगार संघाने एक दिवसाचा पगार म्हणून तीन लाखांची कपात करून घेऊन ती रक्कम बॅंक खात्यावर जमा करून घेतली. मात्र, ती पूरग्रस्तांना अद्यापही दिली नसल्याची तक्रार कारखान्याच्या 166 कायम कामगारांनी सरव्यवस्थापक जगदाळे यांच्याकडे गेल्या दहा तारखेला केली आहे. या तक्रारीबाबतचाही तपास पोलिस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Relief Fund Sangli Kolhapur Case Resgisterd Against Two In Koregoan Satara News