रेमडिसिव्हर इंजेक्‍शन्सच्या निर्णयाबाबत साताऱ्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज

उमेश बांबरे
Tuesday, 29 September 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत जिल्ह्यात तुटवडा भासणारी रेमडिसिव्हरची इंजेक्‍शन्स गरजूंना उपलब्ध व्हावीत, यासाठी रेमडिसिव्हर इंजेक्‍शन बॅंक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात रेमडिसिव्हर इंजेक्‍शन्सचा तुटवडा जाणवत असून, गंभीर रुग्णांना हे इंजेक्‍शन मिळविण्यासाठी काळ्या बाजारातून चढ्या दराने खरेदी करावी लागत आहे. अशा स्थितीत रुग्णांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जिल्ह्यात ना नफा, ना तोटा तत्त्वावर रेमडिसिव्हर इंजेक्‍शन्सची बॅंक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे 200 इंजेक्‍शन्सची मागणी एका फार्मासिस्टच्या माध्यमातून केली. पण, त्याला अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तस्तरावरील अधिकाऱ्यांनी ब्रेक लावला आहे.
 
इतक्‍या मोठ्या प्रमाणात इंजेक्‍शन्स कशाला हवी आहेत, असा दम भरून ही इंजेक्‍शन्स देण्यास कंपन्यांना मज्जाव केला आहे. त्यामुळे सत्तेत असूनही साताऱ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वेगळ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत जिल्ह्यात तुटवडा भासणारी रेमडिसिव्हरची इंजेक्‍शन्स गरजूंना उपलब्ध व्हावीत, यासाठी रेमडिसिव्हर इंजेक्‍शन बॅंक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुमारे पाच लाख रुपयांचा निधी जमा करून दोनशे इंजेक्‍शन्सची मागणी केली आहे.

रुग्णांच्या नातेवाइकांची ससेहाेलपट थांबविण्यासाठी राष्ट्रवादीची विशेष हेल्पलाईन

एका फार्मासिस्टच्या माध्यमातून ही इंजेक्‍शनची मागणी कंपनीकडे केली. पण, या सर्व प्रक्रियेला अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आडकाठी घातली आहे. इतकी इंजेक्‍शन्स कशाला हवीत, असे विचारत इंजेक्‍शन्स देण्यास कंपनीला रोखले आहे. त्यामुळे एका चांगल्या प्रक्रियेला खो घालण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त पातळीवरील अधिकारी करत आहेत. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने मंत्री राजेंद्र शिंगणे यांना याबाबतची माहिती दिली. तरीही याकडे अधिकारी दुर्लक्ष करून इंजेक्‍शन देणाऱ्या कंपन्यांवर दबाव आणत आहेत.

ठाकरे कुटुंबियांच्या आवडत्या हाॅलिडे डेस्टिनेंशनला मिळाला 'ब' वर्ग दर्जा

त्यामुळे खुद्द शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जिल्ह्यात रेमडिसिव्हर इंजेक्‍शन ना नफा, ना तोटा तत्त्वावर उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला असतानाही त्याला अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ब्रेक लावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत प्रचंड नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Food And Drugs Department Hold Sale Of Remdesivir Injection To Nationalist Congress Party Satara News