esakal | इंद्रजाल विक्रीप्रकरणी सातारा, कऱ्हाडामध्ये वन विभागाचे छापे
sakal

बोलून बातमी शोधा

इंद्रजाल विक्रीप्रकरणी सातारा, कऱ्हाडामध्ये वन विभागाचे छापे

इंद्रजाल विक्रीप्रकरणी सातारा, कऱ्हाडामध्ये वन विभागाचे छापे

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : सातारा वन विभागाच्‍या पथकाने चोवीस तासांत सातारा येथील तीन पूजा साहित्‍य विक्री करणाऱ्या दुकानांवर छापा टाकत इंद्रजाल, चंदनाचे तुकडे, मोरपिसे, हत्ताजोडी आदी वनसामग्री व वन्‍यप्राण्‍याचे अवशेष जप्‍त केले. याप्रकरणी सदाशिव पेठेतील पंचमुखी पूजा साहित्‍य, दत्त पूजा भांडार आणि शाहू स्‍टेडियम येथील कोटेश्‍‍वर पूजा साहित्‍य दुकानांच्‍या चालकांवर गुन्‍हा नोंदवत तिघांना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.

सातारा, तसेच कऱ्हाड येथील पूजा साहित्‍य विक्री दुकानात वन्‍यप्राण्‍यांचे अवशेष, चंदन, तसेच इंद्रजाल ऊर्फ काळे कोरल यांची विक्री होत असल्‍याची माहिती सातारा वन विभागास मिळाली होती. यानुसार उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले, महेज झांजुर्णे, नवले, वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्‍हाण, पावरा, वनपाल प्रशांत पडवळ, सुहास भोसले, साधना राठोड, राजू मोसलगी, अशोक मलप, सूर्याजी ठोंबरे, सुरेश गभाले, संतोष दळवी यांची पथके कारवाईसाठी रवाना केली.

हेही वाचा: "शेतकऱ्यांना चिरडणारे वाहन आपलेच पण..."; केंद्रीय मंत्र्याची कबुली

यापैकी एका पथकाने काल साताऱ्यातील सदाशिव पेठेतील पंचमुखी, तसेच दत्त पूजा साहित्‍य भांडारवर छापा टाकत विक्रीस मनाई असलेले ५९ इंद्रजाल ऊर्फ काळे कोरल, ८० किलो वजनाचे चंदनाचे तुकडे, ६०० मोरपिसे अशी वनसंपदा आणि समुद्री प्राण्‍यांचे अवशेष जप्‍त केले. याप्रकरणी संतोष लक्ष्‍मण घोणे (रा. सदाशिव पेठ, सातारा), दत्तात्रय सदाशिव धुरपे (रा. सातारा) यांना ताब्‍यात घेत त्‍यांच्‍यावर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. आज शाहू स्‍टेडियम येथील कोटेश्‍‍वर पूजा साहित्‍य येथे छापा टाकत वन विभागाने घोरपड या वन्‍यप्राण्‍याचे हत्ताजोडी असणारे ९ भाग, मोरपिसे जप्‍त केली. याप्रकरणी राहुल विजय निकम (रा. सातारा) याला ताब्‍यात घेत त्‍याच्‍यावर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

कऱ्हाड येथील विजय बाबूराव धावडे यांच्‍या दुकानावर प्रशांत जनरल ॲण्ड पूजा भांडार या दुकानांवर देखील वन विभागाच्‍या पथकाने छापा टाकला. या कारवाईत १८ इंद्रजाल, १८ हत्ताजोडी, वनप्राण्‍याच्‍या चामडीपासून बनविलेल्‍या सहा वस्‍तू जप्‍त करण्‍यात आल्‍या. याप्रकरणी विजय बाबूराव धावडे आणि प्रवीण प्रकाश देशमुख (रा. कऱ्हाड) यांच्‍यावर गुन्‍हा नोंदवत त्‍यांना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे. जप्‍त साहित्‍याची किंमत निश्चित करण्‍याची प्रक्रिया वन विभागाकडून सुरू आहे.

loading image
go to top