VIDEO : अबब.. दहा फुटी मगर येरळवाडी नदीपात्रात; नागरिकांचा उडाला थरकाप

शशिकांत धुमाळ
Thursday, 19 November 2020

गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे नदीपात्रात समाधानकारक पाण्यात वाढ झाली होती. त्यामुळे येरळा धरणातील पाणी पातळी वाढून धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. या वाढत्या व वाहत्या पाण्यातून ही मगर येरळा धरणात आली असल्याचा प्राथमिक अंदाज नागरिक व प्रशासनाने व्यक्त केला.

निमसोड (जि सातारा) : येरळा धरणाच्या जुन्या नदीपात्रात मगर असल्याचे काही नागरिकांना दिसून आले. त्यानंतर वनविभाग, तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. येरळा नदी पात्रात मगर असल्याचे समजताच परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर मगरीला जेरबंद करण्यात यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे नदी पात्रात समाधानकारक पाण्यात वाढ झाली होती. त्यामुळे येरळा धरणातील पाणी पातळी वाढून धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. या वाढत्या व वाहत्या पाण्यातून ही मगर येरळा धरणात आली असल्याचा प्राथमिक अंदाज नागरिक व प्रशासनाने व्यक्त केला. या परिसरातील नागरिकांना याठिकाणी मगरीचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती.

व्वा! क्या बात है.. नेता हो तो ऐसा; रोहित पवारांच्या मदतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

याबाबत नागरिकांनी वनपरीक्षेत्रपाल शीतल फुंदे यांना संपर्क साधला असता, वनविभागाने तातडीने याठिकाणी भेट देत परिसरात पाहणी केली. बनपुरीचे पोलिस पाटील अमोल चव्हाण, वनविभागाचे कर्मचारी व  सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख घटनास्थळी दाखल झाले. मगर असल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी याठिकाणी बघण्यासाठी गर्दी केली होती. मगरीला पकडण्याचे काम रात्रभर सुरू होते. अंबवडे व बनपुरी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी मगर पकडण्यासाठी सातारा व वडूज वनविभाग यांनी शर्थीची प्रयत्न केले. मात्र, स्थानिक मेंढपाळाच्या जाळ्यामुळेच मगर जेरबंद करण्यात यश आले. दुष्काळी भागात मगर दिसणे म्हणजे एक नवलच ठरल्याने बघ्यांची प्रचंड गर्दी काहीकाळ प्रशासनाला तापदायक ठरली. जेरबंद केलेली मगर सातारा व वडूज वनविभागामार्फत कोल्हापूर वनविभागाकडे सोपविण्यात आली.

मगर येरळवाडीत, जाळे मात्र सातार्‍यात : मगर पकडण्यासाठी वडूज व सातारा वनविभागाकडे जाळे घटनास्थळी नसल्याने स्थानिक मेंढपाळाच्या जाळ्याच्या सहाय्याने मगरीली जेरबंद करण्यात यश आले. त्यामुळे मगर येरळवाडीत, मात्र जाळे सातार्‍यात वनविभाग विसरल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forest Department Succeed In Catching Ten Feet Crocodile In Yeralwadi Lake Satara News