esakal | पाटण तालुक्‍यात पाच गव्यांचा कळप विहिरीत कोसळला; धावडेत मुक्‍या प्राण्यांचे जीवन धोक्यात
sakal

बोलून बातमी शोधा

patan taluka

पाटण तालुक्‍यात पाच गव्यांचा कळप विहिरीत कोसळला; धावडेत मुक्‍या प्राण्यांचे जीवन धोक्यात

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

पाटण तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. तेथेही घनदाट जंगल आहे. उन्हाळ्यात डोंगरांना मोठ्या प्रमाणात वणवे लावले जातात. त्यामुळे हिरवेगार डोंगर काळेकुट्ट होतात. वनविभागाला सुद्धा त्याची भनक नसते. वनक्षेत्र असलेले पाणवठे पाण्याअभावी ओस पडल्याने गवे नैसर्गिक अधिवासातून बाहेर येत आहेत. पाण्याच्या शोधात असलेले पाच गवे विहिरीत पडल्याची दुर्दैवी घटना धावडे गावात नुकतीच घडली. त्यात एका गव्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

गवे, बिबट्या मानवी वस्तीत येणे नवीन राहिलेले नाही. गवा जंगलात होता. नंतर तो शेतात आणि सध्या गावात आला आहे. खरं तर गवा हा जंगली प्राणी महाकाय आणि वजनदार आहे. हा रवंथ करणारा प्राणी असून, गवत, झाड पाला हे त्याचं खाद्य आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या वणव्यात वनसंपदा जळून त्यांचे खाद्य नष्ट झाले. त्यामुळेच ते नागरी वस्तीत येत आहेत. त्यासाठी आता नागरिकांचेच प्रबोधन करण्याची गरज आहे.

वन विभागाच्या पुढाकाराची गरज

जंगलातील पाणवठे पाण्याअभावी ओस पडले आहेत. डोंगरांना सातत्याने वणवे लावले जात आहेत. त्याचा विचार करून आता वन विभागानेच पुढे येऊन डोंगरांना लावले जाणारे वणवे रोखण्याची आणि वन्य प्राण्यांच्या पाण्याची सोय करण्याची गरज आहे. प्राण्यांना त्यांच्या परिसरात आवश्‍यक त्या सुविधा देण्यात आल्यास त्यांचे नागरी वस्तीतील वावर बंद होऊन त्यांची सुरक्षित राहतील.