महाबळेश्वर : वनसदृश्य मिळकतींची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध; आक्षेपासाठी कागदपत्र दाखल करा!

अभिजीत खुरासणे
Friday, 8 January 2021

महाबळेश्वरचा परिसर हा पश्चिम घाट विभागात मोडतो. या ठिकाणी सदाहरित जंगलाचा मोठा खजिना आहे, परंतु बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून निसर्ग संपदेची लूट करण्यात येत आहे. बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या निसर्गाच्या हानीमुळे येथील पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

महाबळेश्वर (जि. सातारा) : न्यायालयाच्या निर्देशानुसार पाहणी करण्यात आलेल्या वनसदृश्य मिळकतींची माहिती संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या संदर्भात कोणाला काही हरकती नोंदवायच्या असतील, तर त्या 29 जानेवारी पूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांसह दाखल कराव्यात, असे आवाहन प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांनी केले आहे. 

महाबळेश्वरचा परिसर हा पश्चिम घाट विभागात मोडतो. या ठिकाणी सदाहरित जंगलाचा मोठा खजिना आहे, परंतु बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून निसर्ग संपदेची लूट करण्यात येत आहे. बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या निसर्गाच्या हानीमुळे येथील पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचा धोका निर्माण झाला आहे, ही बाब लक्षात घेवून 2001 मध्ये महाबळेश्वर तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील घोषित करण्यात आला. 2006 मध्ये महाबळेश्वर तालुक्यातील अनेक मिळकतींची पाहणी करून त्या मिळकतींमधील वृक्षांची गणना करण्यात आली होती. या पाहणी अहवालावर आक्षेप घेवून मुंबई येथील एका पर्यावरण प्रेमी संस्थेने येथील वनसंरक्षणासाठी राष्ट्रीय हरीत लवादाकडे धाव घेतली. राष्ट्रीय हरीत लवादाने संस्थेने केलेल्या मागणीप्रमाणे वनसदृश्य मिळकतींचा फेर सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या या निर्देशानुसार प्रांताधिकारी राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर तालुक्यातील अनेक वनसदृश्य मिळकतींचा फेर सर्व्हे करण्यात आला. यासाठी वाई, महाबळेश्वर व खंडाळा तालुक्यातील 125 कर्मचाऱ्यांची 25 पथके तयार करण्यात आली होती. वनसदृश्य पाहणीचे काम आता पूर्ण झाले आहे. 

दुचाकींच्या चाकाचा आऊट काढत आयुष्याच्या चाकांना गती; महेशची अपंगत्वावर जिद्दीने मात

2006 साली केलेला अहवाल संबंधितांना पाहता आला नाही, म्हणून तो सर्व्हे आता संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. या सर्व्हेच्या अनुषंगाने जर हितसंबंधित पक्षकार व व्यक्तींना काही हरकत अथवा म्हणणे लेखी स्वरूपात कागदपत्रांच्या पुराव्यासह दाखल करावयाचे असेल, त्यांनी 29 जानेवारीपर्यंत उपविभागीय कार्यालय, वाई येथे दाखल करावे, असे आवाहनही वाईच्या प्रांताधिकारी राजापुरकर यांनी केले आहे. दरम्यान, पाहणी अहवालाबाबत आलेल्या हरकतींची सुनावणी घेण्यात येणार आहे. वनसदृश्य मिळकतीमध्ये जर बांधकाम असेल, तर त्या संदर्भातील पुरावे संबंधितांनी सादर करावयाचे आहेत. या कागदपत्रांच्या आधारे सुनावणी घेण्यात येणार आहे. हरकत घेतली नाही, तर संबंधितांना या वनसदृश्य पाहणी अहवालाबाबत काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरण्यात येणार आहे. संबंधितांना हरकती घेता यावे, म्हणून या बाबतची माहिती ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, पंचायत समिती महाबळेश्वर व पांचगणी नगरपरिषद येथील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात यावी, अशा सूचना तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी कार्यालयांना केली आहे.

  • प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानुसार  https://www.satara.gov.in या संकेतस्थळावर आपला आक्षेप नोंदवावा.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forestry Property Of Citizens Mahabaleshwar Declared On Forest Department Website Satara Environmental News