महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षांना अटक; नोकरीच्या आमिषातून तिघांना गंडा

भद्रेश भाटे
Sunday, 18 October 2020

आखाडे व थोरात यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर वाई पोलिसांनी आखाडेला अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर आज (रविवार) न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

वाई (जि. सातारा) : सातारा जिल्हा न्यायालयात लिपिक व स्टेनो पदावर नोकरी लावतो, असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष संतोष मारुती आखाडे व अन्य एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आखाडेस अटक केली आहे. सध्या त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. 

निवृत्त न्यायाधीश हे माझ्या ओळखीचे आहेत, असे सांगून व संगनमत करून संतोष आखाडे व निलेश रामदास थोरात (कोथरूड, पुणे) या दोघांनी पत्नीला नोकरी लावण्याचे अमिष दाखवले. त्यासाठी अडीच लाख रुपये घेतल्याची फिर्याद कुमार धोत्रे (गुरे बझार झोपडपट्टी, सिद्धनाथवाडी, वाई) यांनी जानेवारीमध्ये वाई पोलीस ठाण्यात दिली होती. अशाच प्रकारे इतर तिघांची मिळून साडेनऊ लाख रुपयांची फसवणूक केली. नोकरी मिळत नाही म्हणून पैसे मागण्यास गेलो असता संबंधितांनी दमदाटी व शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. 

गुन्हेगारी माेडीत काढणे हेच माझे ध्येय : आंचल दलाल

आखाडे व थोरात यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर वाई पोलिसांनी आखाडेला अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर आज (रविवार) न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. दरम्यान, निलेश थोरात फरारी आहेत. याबाबत अजून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी वाई पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी केले आहे. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कदम तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Mahabaleshwar Mayor Arrested By Police Satara News