सातारा : चार पुलांना धोका कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Four bridges remain in danger Highways Authority Bridges will be repaired in six lane highway satara

सातारा : चार पुलांना धोका कायम

सातारा : मागील वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना आलेल्या पुराचे पाणी महामार्गावरील काही पुलांवरून वाहिले होते. या पुरामुळे महामार्गावरील चार पुलांना धोका निर्माण झाला होता. संबंधित पुलांचे ऑडिट करण्यात आले. पण, अद्यापही या पुलांची दुरुस्ती हाती घेतलेली नाही. आता ही दुरुस्ती सहापदरीकरणाच्या कामाच्यावेळीच केली जाणार आहे. येत्या दोन महिन्यांत वळसे ते कागल या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू होणार आहे.

जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाचे पुणे ते वळसेपर्यंतचे सहापदरीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. वळसे ते कागल या मार्गाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून आदानी ग्रुपला हे काम मिळालेले आहे. साधारण १,२०० ते १,५०० कोटींच्यादरम्यान हे काम आहे. सध्या कऱ्हाड परिसरात हे काम सुरू असल्याचे महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मागील पावसाळ्यात कोयना, कृष्णा या नद्यांना पूर आल्यामुळे या नद्यांचे पाणी महामार्गावरील पुलांवरून वाहिले होते. सुरक्षिततेच्या कारणासाठी आठवडाभर हे प्रमुख पूल वाहतुकीसाठी बंद होते. या पुलांची तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतरच या पुलांवरील वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यामध्ये काही दुरुस्त्या सुचविण्यात आल्या होत्या. मात्र, वर्षभरापासून या कामांकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

या संदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सातारा दौऱ्यावर आलेल्या असताना त्यांनी त्याचा आढावा बैठकीत घेतला होता. त्यावेळी चार महामार्गांवरील चार पूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आलेले होते. त्यांनी या पुलांची तसेच गळक्या धरणांची तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना केली होती. त्याचा आढावाही त्यांनी घेतला आहे. मात्र, जिल्ह्यातील या चार पुलांवरून आजही वाहतूक सुरू आहे. पावसाळा अगदी तोंडावर आलेला असल्याने किमान सुरक्षेसाठी तरी या पुलांची दुरुस्ती करायला हवी. हे पूल महामार्ग विभागाकडे असल्याने तसेच किरकोळ दुरुस्ती असल्याने हे काम सहापदरीकरणाच्या कामावेळीच करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी चांगला पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने यावेळेसही पुराच्या पाण्याचा सामना या पुलांना करावा लागल्यास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या पुलांचे पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करून तातडीने दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा वाहनधारकांतून होत आहे.

तात्पुरती दुरुस्ती करण्याचीही गरज

महामार्गावरील पुलांसोबतच सातारा जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांवरील काही पूल शंभरी पार केलेले आहेत. त्या पुलांची तपासणी करून त्यांच्यापासून धोका निर्माण होणार नाही, याची माहिती घेऊन त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. महामार्गावरील पुलांची तात्पुरती दुरुस्ती करण्यावरही महामार्ग प्राधिकरणाने भर द्यायला हवा, अशी चर्चा वाहनधारकांतून होत आहे.

Web Title: Four Bridges Remain In Danger Highways Authority Bridges Will Be Repaired In Six Lane Highway Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top