esakal | 'गरीब कल्याण'मधून 80 कोटी लोकांना मोफत धान्य; उदयनराजेंकडून मोदींचं कौतुक

बोलून बातमी शोधा

Garib Kalyan Yojana
'गरीब कल्याण'मधून 80 कोटी लोकांना मोफत धान्य; उदयनराजेंकडून मोदींचं कौतुक
sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोना आणि लॉकडाउन, अनलॉक, "ब्रेक द चेन' आदी उपाययोजनातून आज सामान्य व्यक्ती व कुटुंबे आर्थिक विवंचनेत आहेत. त्यामुळेच देशातील गरिबातील गरीब जगला पाहिजे. या उदात्त धोरणातून मे आणि जून या दोन महिन्यांकरिता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून प्रत्येक गरीब कुटुंबाला मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. या योजनेतून सातारा जिल्ह्यासह राज्यात मोफत अन्नधान्य पुरवठा गरिबांपर्यंत पोचविण्यासाठी प्रशासनाच्या बरोबरीने एनजीओंचे सहकार्य घेऊन प्रयत्न केले जातील, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. दरम्यान, या निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे.

यासंदर्भात उदयनराजेंनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले, की कोरोना काळात हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबाची उपासमार होऊ नये, म्हणून अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. मात्र, तरी कोणताही गरीब अन्नधान्यापासून वंचित राहू नये म्हणून केंद्र सरकारने मे आणि जून या दोन महिन्यांकरिता सुमारे 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करून देशातील प्रत्येक कुटुंबाला गहू, तांदूळ मोफत पुरवण्याचे धोरण आखले आहे. या योजनेतून देशातील 80 कोटी व्यक्तींना याचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.

VIDEO : नगरसेवकांचं असंही दातृत्व; 'विलगीकरणा'साठी दिलं मोफत हॉटेल, जेवणाचीही केली सोय

कोरोना काळात प्रशासनावर विशेष करून सार्वजनिक आरोग्य विभाग, पोलिस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसूल विभागांवर ताण आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक गरीब कुटुंबापर्यत हे धान्य वेळेत आणि सुलभ रीतीने, तसेच कोणत्याही प्रकारची गर्दी न होता वितरित करण्याचे मोठे आव्हान आहे. मोफत धान्य वाटपाबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहोत, तसेच योजनेच्या मार्गदर्शक सूचना, तत्त्वे याचा विचार करून त्यांनी कृती आराखडा तयार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Edited By : Balkrishna Madhale