esakal | VIDEO : नगरसेवकांचं असंही दातृत्व; 'विलगीकरणा'साठी दिलं मोफत हॉटेल, जेवणाचीही केली सोय

बोलून बातमी शोधा

Mahabaleshwar
VIDEO : नगरसेवकांचं असंही दातृत्व; 'विलगीकरणा'साठी दिलं मोफत हॉटेल, जेवणाचीही केली सोय
sakal_logo
By
अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (सातारा) : येथील ज्येष्ठ नगरसेविका विमलताई पारठे यांनी आपले संपूर्ण हॉटेल कोरोनाबाधितांच्या विलगीकरण कक्षासाठी मोफत पालिकेच्या स्वाधीन केले. तर, याच विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या बाधितांच्या नाश्‍ता, चहा व दोन वेळच्या जेवणाची सोय नगरसेवक रवींद्र कुंभारदरे हे मोफत करणार आहेत. या दोन नगरसेवकांच्या दातृत्वाचे शहरातून कौतुक होत आहे.

कोरोनाबाधितांच्या सोईसाठी नगराध्यक्षांनी विलगीकरणाची सोय केली होती. परंतु, या कक्षात दाखल होण्यासाठी पाच हजार रुपये भरावे लागणार होते. कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाला असून अनेकांचे रोजगार बंद आहेत. अशा स्थितीत विलगीकरण कक्षासाठी पाच हजार रुपये भरणे कठीण होणार असल्याने अशा रुग्णांच्या मदतीसाठी येथील माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविकांनी विलगीकरणासाठी संपूर्ण हॉटेल पालिकेच्या स्वाधीन केले.

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार; पोलिस अधीक्षकांचे स्पष्ट संकेत

विलगीकरण कक्ष सुरू करण्यापूर्वी तेथील सुविधांची मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पाहणी केली. या वेळी उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, नगरसेविका विमलताई पारठे, शारदा ढाणक, स्नेहल जंगम, नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, संदीप साळुंखे, प्रकाश पाटील, संजय पिसाळ, ऍड. संजय जंगम आदींसह रोहित ढेबे, संदीप मोरे, अनिकेत रिंगे, संजय दस्तुरे उपस्थित होते. दोन दिवसांत विलगीकरण कक्ष सुरू करणार असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. कोरोनाबाधितांच्या सोईसाठी पालिकेचे दोन नगरसेवकांनी दाखविलेल्या दातृत्वाचे शहरातून कौतुक होत आहे.

Edited By : Balkrishna Madhale