''सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलाल तर देशद्रोही ठराल''

हेमंत पवार
Sunday, 21 February 2021

विलासकाकांच्या निधनानंतरचा पहिलाच कार्यक्रम असल्याचे जड अंतकरणाने सांगून ऍड. उदयसिंह पाटील म्हणाले, ""काकांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानाबरोबरच समाज प्रबोधनाचा ज्ञानयज्ञ तेवत ठेवला. तो ज्ञानयज्ञ पुढे अखंडपणे सुरू ठेवला जाईल. समाज प्रबोधनाच्या या यज्ञात युवकांनी पुढाकार घ्यावा.''

कऱ्हाड : देशात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलले, की त्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. ज्यांचा स्वातंत्र्य आंदोलनात काडीचाही संबंध नव्हता ते गांधींचा वारसा सांगणाऱ्यांना देशद्रोही ठरवत आहेत. देशातील विचारांचा वारसा आणि वसा नष्ट करून जातीय उतरंड तयार करण्याचे षडयंत्र देशात सुरू आहे. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी नव्या आंदोलनाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
 
स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांच्या 47 व्या स्मृतिदिन आणि विलासकाकांवरील "तेजगडचा एकलव्य' या स्मरणिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, युवा नेते ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, पत्रकार संजय आवटे, उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त प. ता. थोरात, ऍड. विजयसिंह पाटील, प्राचार्य गणपतराव कणसे, प्रा. धनाजी काटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्री. कुलकर्णी म्हणाले, ""नवी पिढी आणि गेलेली पिढी याचा सांधा जोडण्याचे काम विलासकाकांनी केले. पूर्वीची जातीच्या उतरंडीची चातुर्वण व्यवस्था प्रस्थापित करून पुन्हा वाद निर्माण करण्यासाठी देशातील सत्ताधाऱ्यांची वाटचाल सुरू आहे. महात्मा गांधीच्या प्रतिमेला भगवे वस्त्र असलेल्या महिलेने गोळ्या झाडल्या. त्यांच्या प्रतिमेलाही गोळ्या घालाव्या वाटतात यावरून हिंसा मनात किती भरली आहे, हे दिसून येते. या हिंसक कालखंडात पुन्हा एकदा गांधी, फुले, शाहू, आंबेडकर, उंडाळकर यांचा वारसा घेऊन पुढे जायचे आहे.''
 
खासदार पाटील म्हणाले, ""स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी आयुष्य वेचले त्यांचे चिरंतन स्मरण देशपातळीवर फक्त उंडाळेत होते. त्यातून राष्ट्रीय विचार सामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम विलासकाकांनी आयुष्यभर केले. कार्यकर्ता कसा शोधावा याची हातोटी त्यांना होती. समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवून वाडीवस्तीपर्यंत विकासकामे पोचवली.'' पत्रकार आवटे यांनी देशात संविधानिक मार्गाने संविधान तुडवण्याचे काम सुरू आहे. ते रोखण्यासाठी नव्या पिढीला फुले, शाहू, आंबेडकर, उंडाळकर यांचा इतिहास सांगणे आवश्‍यक आहे, असे सांगितले. प्राचार्य गणपतराव कणसे यांनी आभार मानले. 

उदयसिंह पाटील झाले भावनावश 

विलासकाकांच्या निधनानंतरचा पहिलाच कार्यक्रम असल्याचे जड अंतकरणाने सांगून ऍड. उदयसिंह पाटील म्हणाले, ""काकांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानाबरोबरच समाज प्रबोधनाचा ज्ञानयज्ञ तेवत ठेवला. तो ज्ञानयज्ञ पुढे अखंडपणे सुरू ठेवला जाईल. समाज प्रबोधनाच्या या यज्ञात युवकांनी पुढाकार घ्यावा.''

Feeling Proud : जवान गौरव ससाणेंनी दोन अतिरेक्‍यांना धाडले यमसदनी

सहा विद्यार्थी कोरोनाबाधित; शिक्षक सुखरुप, विद्यालय बंद

अथणी- रयत कारखान्याने एफआरपीपेक्षा दिला जादा दर; शेतकरी समाधानी

सेनेने जाहीर केली सातारा पालिका निवडणूकीची रणनीती

लाखात एखादीच घटना! डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश, गर्भधारणा झालेल्या महिलेला जीवदान! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Freedom Fighters Meeting In Undale Satara Marathi News