
हुतात्मा चंद्रकांत जाधव यांना अखेरचा निरोप
विसापूर - पंजाब प्रदेशात कर्तव्य बजावताना वयाच्या ४४ व्या वर्षी वीरमरण आलेले कातळगेवाडी (निढळ, ता. खटाव) येथील आर्मी एअर डिफेन्सचे १४४ एडी रेजिमेंटचे हवालदार हुतात्मा चंद्रकांत प्रभाकर जाधव यांच्या पार्थिवावर आज (रविवार) कातळगेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यातील नागरिक व आजी-माजी सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
पंजाब येथील चंदी मंदिर येथून आपल्या युनिटकडे परतताना प्रवासात हृदयविकाराचा झटका आल्याने चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. या घटनेची बातमी समजताच कातळगेवाडीसह तालुक्यात शोककळा पसरली होती. त्यांचे पार्थिव आज सकाळी ८.०० वाजता कातळगेवाडी येथे आणण्यात आले. सुरुवातीला पार्थिव घरी पोचताच विजय शिंदे यांच्या कुटुंबीय, नातेवाइकांनी हंबरडा फोडला.
यावेळी अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. ‘चंद्रकांत जाधव अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम’च्या जयघोषात चंद्रकांत यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
दरम्यान, हुतात्मा चंद्रकांत जाधव यांचे पहिली ते चौथी शिक्षण कातळगेवाडी येथे तर चौथी ते दहावी शिक्षण निढळ येथे झाले व अकरावी, बारावीचे शिक्षण महिमानगड विद्यालयात झाले. त्यानंतर ते फौजमध्ये भरती झाले. त्यांनी २४ वर्षे देशसेवा बजावली. त्यांच्या वडिलांनीदेखील देशसेवा बजावली असून त्यांचे दोन भाऊ देशसेवेत आहेत.
Web Title: Funeral Of Martyr Chandrakant Jadhav Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..