वीर जवान शेळके यांच्यावर अंत्यसंस्कार

खटावमध्ये हजारोंची उपस्थिती; जवानांची मानवंदना
Funeral on Veer Jawan Shelke
Funeral on Veer Jawan Shelke

खटाव - येथील वीर जवान सूरज प्रताप शेळके (वय २३) यांच्या पार्थिवावर शनिवारी मध्यरात्रीनंतर शोकाकूल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशसेवा बजावताना वीरमरण आलेल्या सूरजच्या अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता. पोलिस व लष्कराच्या जवानांकडून हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. सूरज यांचे लहान बंधू गणेश याने पार्थिवाला भडाग्नी दिला.

जवान सूरज शेळके याला लष्कराच्या ऑपरेशन रक्षक दरम्यान लेह-लडाख येथे गुरुवारी वीरमरण आले होते. सूरज हुतात्मा झाल्याचे समजताच त्याच्या मित्रपरिवार आणि गावकऱ्यांना दु:ख अनावर झाले होते. वीर जवान सूरजच्या पार्थिवाकडे खटावकरांचे डोळे लागले होते. लडाख येथून दिल्ली व तेथून पुणे विमानतळावर पार्थिव आणल्यानंतर त्या ठिकाणी मानवंदना देण्यात आली. त्यानंतर खटाव येथे शनिवारी रात्री ११ वाजता पार्थिव आणण्यात आले. सूरजचे पार्थिव पाहताच त्याच्या आई, वडील, कुटुंबिय आणि मित्रपरिवाराने केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. पार्थिव गावात येण्यापूर्वी संपूर्ण गावातील आणि अंत्यविधीच्या ठिकाणापर्यंतच्या रस्त्यांच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. रात्री उशिरा अंत्ययात्रा सुरू झाल्यावर हजारो ग्रामस्थ आणि आजी -माजी सैनिक संघटनेच्या शिलेदारांनी सूरज यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली.

मध्यरात्री दीड वाजता खटाव-पुसेगाव मार्गावरील पटांगणात फुलांनी सजविलेल्या चबुतऱ्यावर सूरजचा अंत्यविधी पार पडला. लष्कराने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. लहान बंधू गणेश याने सूरजच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, प्रिया शिंदे, पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, डॉ. अरुणा बर्गे, राहुल पाटील, नायब तहसीलदार रविराज जाधव, अधिकारी आणि आजी-माजी सैनिक, ग्रामस्थांनी श्रध्दांजली अर्पण केली.

देशभक्‍तिपर गीते

वीर जवान सूरज यांची अंत्ययात्रा रात्री ११ वाजता सुरू झाली. सर्वच रस्त्यांवर पुष्पवृष्टी केली जात होती. ध्वनिक्षेपकावर देशभक्तिपर गाणी लावली होती. ‘भारत माता की जय, वीर जवान सूरज अमर रहे,’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. आपल्या गावच्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो खटावकर मध्यरात्रीनंतरही रस्त्यांच्या दुतर्फा साश्रू नयनांनी उभे होते. अंत्ययात्रेत युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com