esakal | Ganeshotsav 2021 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी सहा प्रकारच्या ‘फ्लेवर'चे मोदक बाजारात
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2021

शहरात प्राधान्याने, मिठाईच्या दुकानात उत्सवकाळात हमखास मोदक तयार असतात.

बाप्पाच्या नैवेद्यासाठी सहा प्रकारच्या ‘फ्लेवर'चे मोदक बाजारात

sakal_logo
By
दिलीपकुमार चिचंकर

सातारा : गणरायाला खुष करण्यासाठी त्याच्या आवडीचे मोदक यावर्षी वैविध्‍य घेऊन आले असून, गणेशाच्या नैवेद्यात उकडीच्या मोदकांबरोबरच गुलकंद, स्ट्रॉबेरीसह विविध सहा प्रकारच्या ‘फ्लेवर'चे मोदक असणार आहेत. मोदकाची चव आणि सुगंधात विविधता आणली असली तरी त्याचे दर स्थिर ठेऊन हलवायांनी भक्तांना दिलासा दिला आहे.

गणरायाच्या नैवद्यात मोदकांना फार महत्त्‍व असते. प्रत्येक घरात या काळात गूळ-खोबऱ्याच्या सारणाचे उकडीचे मोदक केले जातात. २१ मोदकांचा नैवद्य दाखविला जातो. याबरोबरच माव्याचे तयार मोदक आणण्याकडेही नागरिकांचा कल जास्त असतो. त्यामुळे शहरात प्राधान्याने, मिठाईच्या दुकानात उत्सवकाळात हमखास मोदक तयार असतात. आत्ताच मोदकांची हलवायांच्या दुकानांत रेलचेल झाली आहे. मात्र, यावर्षी मिठाई विक्रेत्यांनी त्यात विविधता आणली आहे. काही दुकानांत उकडीचे मोदकही उपलब्ध आहेत. तर मोदकांमध्ये आंबा, स्‍ट्रॉबेरी, गुलकंद, पिस्ता अशा विविध फ्लेवरची जोड दिली गेली आहे. माव्याचे मोदक साधारण ४८० रुपये किलो आहेत. तर इतर फ्लेवरचे मोदक ६०० रुपये किलो आहेत.

हेही वाचा: मूर्ती कलेतील 'ते' जुने दिवस परतले; ज्येष्ठ कारागिरांची हात कलाकारी

सार्वजनिक गणेशोत्सवात सकाळी आणि रात्री मोठ्या जोशात आरती केली जाते. काही मंडळांचे कार्यकर्ते महाआरत्यांचेही नियोजन करतात. सर्वच आरत्यांना परिसरातील नागरिक गर्दी करतात. त्यांना प्रसाद म्हणून मोदक, विविध प्रकारची मिठाई वाटली जाते. त्यासाठी पाचपासून २१ किलोपर्यंत मंडळांचे कार्यकर्ते मोदक, मिठाई दररोज नेतात. यातून हलवायांची मोठी उलाढाल होते. मात्र, सार्वजनिकरित्या उत्सव साजरे करण्यावर बंधने असल्याने प्रसादासाठी जास्त मोदक, मिठाई जाणार नसल्याने सर्वच मिठाई विक्रेत्यांनी सध्या पदार्थ सावधगिरीने जेमतेम करत असल्याची माहिती मिठाई विक्रेत्यांनी दिली.

हेही वाचा: हरतालिका व्रतात 'या' चुका टाळा, अन्यथा किंमत मोजावी लागेल!

मोदकांच्या दरात फारशी वाढ नाही

यंदा वाढलेले इंधनाचे दर, त्याचा वाहतूक दरावर झालेला परिणाम आणि कोरोनाचे सावट यामुळे कच्च्या मालात काही प्रमाणात वाढ झाली आहे. खव्याचे दर किलोला ३० ते ४० रुपयांनी वाढले असले तरी मोदकांच्या दरात फारशी वाढ केलेली नाही, अशी माहिती योगेश मोदी-लाटकर यांनी दिली.

loading image
go to top