ढेबेवाडी बस स्थानकात कचऱ्याचे साम्राज्य; महामंडळाचे साफसफाईकडे दुर्लक्ष

राजेश पाटील
Saturday, 19 September 2020

ढेबेवाडीच्या स्थानकात विविध आगारांच्या 100 वर बसची दिवसभरात ये-जा असते. एसटीला मोठे उत्पन्न देणारा हा परिसर असून, विद्यार्थी व प्रवाशांची दिवसभर तेथे वर्दळ असते. बस स्थानकाच्या चोहोबाजूंनी झुडपे वाढली असून, संबंधित यंत्रणेचे साफसफाईकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसते आहे.

ढेबेवाडी (जि. सातारा) : लॉकडाउनच्या काळात बंद असलेली एसटी सेवा आता पुन्हा सुरू झाली असली, तरी एसटी महामंडळाला येथील बस स्थानकाच्या साफसफाईला वेळ मिळालेला नाही. स्थानकात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, चोहोबाजूनी झुडपेही वाढली आहेत. बसची प्रतीक्षा करत तेथेच बसण्याशिवाय प्रवाशांसमोरही दुसरा पर्याय उरलेला नाही. 

ढेबेवाडीच्या स्थानकात विविध आगारांच्या 100 वर बसची दिवसभरात ये-जा असते. एसटीला मोठे उत्पन्न देणारा हा परिसर असून, विद्यार्थी व प्रवाशांची दिवसभर तेथे वर्दळ असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाउनमुळे गेल्या काही महिन्यांपासून एसटी सेवा बंद असल्याने येथील बस स्थानकात सन्नाटा होता. वॉचमन नसल्याने पूर्वीपासूनच या बस स्थानकाची स्थिती 'आवो जाओ घर तुम्हारा' अशीच असल्याने बऱ्याचदा मद्यपी, मनोरुग्ण, तसेच अवैध व्यावसायिकांकडे त्याचा ताबा असल्यासारखे चित्र दृष्टीला पडायचे. 

हुतात्मा सचिन जाधव यांना साश्रूनयनांनी निरोप!

लॉकडाउनच्या काळातही असेच चित्र बघायला मिळत होते. साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने स्थानकात सध्या मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, पालापाचोळा पडून कुजल्याने दुर्गंधी पसरली आहे. बस स्थानकाच्या चोहोबाजूंनी झुडपे वाढली असून, संबंधित यंत्रणेचे साफसफाईकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसते आहे. अलीकडे काही प्रमाणात येथे एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या असतानाही बस स्थानकाच्या साफसफाईकडे कानाडोळा केला जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage At Dhebewadi Bus Stand Satara News