Feeling Proud : जवान गौरव ससाणेंनी दोन अतिरेक्‍यांना धाडले यमसदनी

सुनील शेडगे
Sunday, 21 February 2021

कवठे गावाला शौर्याची मोठी परंपरा लाभली आहे. गावातील युवक मोठ्या संख्येने लष्करी सेवेत कार्यरत आहेत. त्यात हिंदुराव डेरे, महादेवराव पोळ, प्रवीण शामराव डेरे, अंबादास पवार, प्रवीण प्रताप डेरे यांसारख्या वीर जवानांनी देशासाठी अतुलनीय कामगिरी बजावताना कवठे गावची शान वाढविली आहे. 

सातारा : "24 डिसेंबरची सकाळ. स्थळ जम्मू-काश्‍मीरमधील बारामुल्ला. "सर्च ऑपरेशन'मध्ये अतिरेकी घुसल्याचे लक्षात येताच लष्कराने नाकाबंदी केली. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. अशातच एक गोळी सू सू करत डाव्या पायातून आरपार गेली. मात्र, तरीही जिवाची पर्वा न करता दोन अतिरेक्‍यांना यमसदनी धाडण्यात यशस्वी ठरलो.'' 

जवान गौरव हरिभाऊ ससाणे यांनी शौर्यगाथेचा थरारक घटनाक्रम श्रीनगरहून "ई - सकाळ'शी बोलताना उलगडला. वाई तालुक्‍यातील कवठे गावच्या या शूरवीराने पायाला गोळी लागूनही आपले कर्तव्य प्राणपणाने बजावले. त्यांच्यावर सध्या सर्व स्तरांमधून मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे. जवान गौरव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लष्करी सेवेत दाखल होण्याचे स्वप्न पुरे केले आहे. आई-वडील शेतमजूर. मात्र, जिद्दीने ते 2014 मध्ये लष्करात भरती झाले. सध्या ते 29, राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत आहेत. 24 डिसेंबर रोजी पराक्रमाची शर्थ गाजविताना पायाला गोळी लागूनही त्यांनी आपली कर्तव्यनिष्ठा अजिबात ढळू दिली नाही. 

गौरव सांगतात, "बारामुल्लातील एका घरात अतिरेकी घुसल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर लष्कराने परिसराची नाकाबंदी केली. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला. एक अतिरेकी सुरवातीलाच मारला गेला. चकमक सुरू असतानाच एक गोळी डाव्या पायाच्या पंज्यात घुसली. मात्र, तरीही स्वतःला अजिबात ढळू दिले नाही. त्यानंतर लष्कराने दुसऱ्या अतिरेक्‍याचा खातमा केला.'' पुढे 42 दिवस गौरव यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. अलीकडे त्यांना सुटीसाठी गावी सोडण्यात आले होते. सुटी आटोपून ते पुन्हा श्रीनगरला रवाना झाले आहेत. 
दरम्यान, या देदीप्यमान कामगिरीबद्दल आमदार मकरंद पाटील यांच्यासह जयहिंद फाउंडेशन तसेच विविध सैनिक, सामाजिक संस्था, ग्रामपंचायत, ग्रामस्थांतर्फे गौरव यांना सन्मानित करण्यात आले. विविध स्तरांतून त्यांच्या कामगिरीचे कौतुकही झाले. 

कवठ्याची शौर्य परंपरा 

कवठे गावाला शौर्याची मोठी परंपरा लाभली आहे. गावातील युवक मोठ्या संख्येने लष्करी सेवेत कार्यरत आहेत. त्यात हिंदुराव डेरे, महादेवराव पोळ, प्रवीण शामराव डेरे, अंबादास पवार, प्रवीण प्रताप डेरे यांसारख्या वीर जवानांनी देशासाठी अतुलनीय कामगिरी बजावताना कवठे गावची शान वाढविली आहे. 

""भारतीय सैन्यदलात काम करताना भारत देशासाठी काहीतरी भव्य असे करून दाखविण्याचे स्वप्न होते. ते पुरे करता आले, याचा मनोमन आनंद वाटतो.'' 

-गौरव ससाणे, जवान 

सहा विद्यार्थी कोरोनाबाधित; शिक्षक सुखरुप, विद्यालय बंद

साताऱ्याहून मुलगी पाहायला आले अन्‌ लग्नच करून निघाले ! वाटेतच वधूने असे काही केले ज्याने वराला फुटला घाम

मेदू वडा बनवायचा आहे? तोही घरच्या घरी; मग या सोप्या टिप्स जाणून घ्या..

लोकशाहीचे नव्हे, तर हे ठोकशाहीचे राज्य; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा

पहिल्याच प्रयत्नात CA परीक्षेत नेहा, प्रतीक्षाची दमदार कामगिरी; राज्यात उंचावले साताऱ्याचे नाव

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gaurav Sasane Memories Indian Army Baramulla Attack Satara Trending News