esakal | लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्या : प्रांताधिकारी उत्तम दिघे I Vaccination
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्या : प्रांताधिकारी उत्तम दिघे

लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्या : प्रांताधिकारी उत्तम दिघे

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड - कोव्हीडची लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र लोक लस घेण्यासाठी येत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्थानिक जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, गावातील सरपंच, माजी सरपंच, पुढारी यांची मदत घेवुन लसीकरण १०० टक्के होईल यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी केले.

कोव्हीड टास्क फोर्स समितीची बैठक आज प्रांताधिकारी दिघे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी डॉ. शशिकांत शिंदे, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी यु.जे.साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल कोरबु, नागरी आरोग्य केंद्राच्या डॉ. कुलकर्णी, रोटरी क्लबचे राजेश खराटे, इंडीयन मेडीकल असोशिएशनचे डॉ. जयवंत पाटील, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, बालविकास प्रकल्प अधिकारी सुप्रिया पोवार, नागेश ठोंबरे, तालुका नर्सिंग अधिकारी अनिता कचरे, विस्तार अधिकारी व्ही. एन. मुळे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोरबु यांनी तालुक्यातील लसीकरण, कोव्हीड टेस्टींग आणि सध्याच्या रुग्णांची स्थिती याची माहिती दिली. डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. तहसीलदार पवार यांनी लसीकरण वाढावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. गटविकास अधिकारी शिंदे यांनी लसीकरण, टेस्टींग वाढावे यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, ज्यांनी लस घेतली नाही त्यांची यादी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अचुक तयार करुन ती पंचायत समितीस सादर करावी, असे सांगीतले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिंदे यांनी उपलब्ध मनुष्यबळातच लसीकरण, टेस्टींगचे करावे लागणार असुन गरोदर महिलांतही लसीकरणाबाबत जनजागृती करुन त्यांचे प्रमाण १०० टक्के होईल याकडे लक्ष द्यावे, असे सांगीतले. डॉ. संजय कुंभार यांनी आभार मानले.

loading image
go to top