चांदोलीत आढळला सोनेरी पाठीचा बेडूक; सिंधुदुर्गात नामकरण सोहळा

सचिन शिंदे
Thursday, 29 October 2020

या बेडकांचे प्रजनन व इतर शास्त्रीय माहितीवर फारसा अभ्यास झालेला नाही. अत्यल्प प्रमाणात माहिती उपलब्ध आहे, असे हेमंत केंजळे यांनी सांगितले.
 

कऱ्हाड :  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील खुंदलापूर परिसरात दुर्मिळ सोनेरी पाठीचा बेडूक प्रथमच आढळून आला. पश्‍चिम घाटात साकारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अभ्यास दौरा सुरू असताना या दुर्मिळ बेडकाची नोंद घेण्यात आली. सिंधुदुर्ग, आंबोली भागात यापूर्वी या दुर्मिळ बेडकाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल सात वर्षांनी या बेडकाची नोंद घेण्यात आली.
 
पर्यावरण अभ्यासक रोहन भाटे, हेमंत केंजळे यांनी त्या बेडकाच्या अस्तित्वाची नोंद घेतली आहे. ते बेडूक दुर्मिळ आहे. आत्तापर्यंत पश्‍चिम महाराष्ट्रात दोनदा त्याची नोंद झाली आहे. लुप्त झालेले उभयचर प्राण्यांवर वन विभाग, आययुसीएन, सांचुरी एशिया व भारतातील लुप्त झालेले उभयचर अशा संघटनेने ऑगस्ट 2012 मध्ये संयुक्तपणे कोयनानगर येथून काम सुरू केले.

PHOTO : कोल्हापुरच्या अवलियाने फोटोग्राफीतून उलगडले पक्षांचे विश्व 
 
दिल्ली येथील डॉ. बिजू दास व त्यांचे सहकाऱ्यांनी 2014 मध्ये सात नवीन लुप्त उभयचर बेडूक प्रजाती शोधल्या होत्या. त्यात या बेडकाचा समावेश आहे. सिंधुदुर्गमध्ये प्रथम या जातीचा बेडूक सापडला होता. सोनेरी पाठीचा बेडूक प्रदेशनिष्ठ आहे. हा बेडूक फक्त याच भागात आढळतो. यापूर्वी सिंधुदुर्ग व आंबोली येथे बेडूक आढळल्याची नोंद आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील उच्च व तीव्र उतार, खडकाळ प्रवाहामुळे आणि धबधब्यांवर बेडकांचे अस्तित्व आहे.
 
व्याघ्र प्रकल्पाचा दहा वर्षांचा आराखडा होत आहे, त्यासाठी वन्यजीव विभागाने कोयना, चांदोली क्षेत्रातील प्रदेशनिष्ठ वनस्पती, वन्यजीव, जैवविविधतेचा आढावा, शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी क्षेत्र संचालक समाधान चव्हाण, उपसंचालक उत्तम सावंत, विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल गोविंद लेंगुटे हे काम करत आहेत. त्याच पहिल्या पाहणी दौऱ्यात भाटे व केंजळे यांनी या दुर्मिळ बेडकाची नोंद केली आहे. 

विकासकामांतून निवडणुकीची नांदी; उदयनराजेंची रणनितीस प्रारंभ

सिंधुदुर्गात नामकरण सोहळा 

भारतात 2012 पासून सुरू झालेल्या कार्यात महत्त्वाचे घटक असलेले व थायरॉकेर लॅबचे उपाध्यक्ष, वन्यजीव छायाचित्रकार डॉ. सीझर सेनगुप्ता यांच्या सन्मानार्थ 2014 मध्ये सिंधुदुर्ग येथे नव्याने सापडलेल्या बेडूक प्रजातीस शास्त्रीय नाव "इंडोसिल्व्हिराना सीझरी' व बोली भाषेत "महाराष्ट्र सोनेरी पाठीचा बेडूक' असे नाव देण्यात आले. त्यांचे प्रजनन व इतर शास्त्रीय माहितीवर फारसा अभ्यास झालेला नाही. अत्यल्प प्रमाणात माहिती उपलब्ध आहे, असे हेमंत केंजळे यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Golden Colour Frog Identified In Sahyadri Tiger Reserve Project Satara News